मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्ज पार्टीत ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुंबईसह कल्याणमधून एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या घटनेने मुंबईतील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये होणाऱ्या अमली पदार्थांचा व्यापार उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आणखी काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
विद्यार्थ्यांनी प्रमाणाहून अधिक डोस घेतले
नेस्को सेंटरच्या हॉल नंबर ५ मध्ये शनिवारी ११ एप्रिलला एका मोठ्या म्युझिक कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. दोन हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मुंबईतील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट सहभागी झाला होता. सुमारे १५ ते १६ जणांचा हा गट ५ ते १० जणांच्या उप-गटांमध्ये आला होता. यातील १० ते १२ विद्यार्थ्यांच्या या गटाने पार्टी सुरू असताना उघडपणे ‘एमडी’ आणि ‘एमए’ यासारख्या घातक अमली पदार्थांच्या गोळ्यांचे सेवन सुरू केले. यातील तिघा विद्यार्थ्यांनी प्रमाणापेक्षा अधिक म्हणजे दोन- दोन डोस घेतले. या अतिरेकामुळे त्यांना ओव्हरडोस झाल्याने श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेतील एका विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याणमधून मुख्य सूत्रधार ताब्यात
या घटनेनंतर ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर आहेत. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून मुख्य ड्रग्स पुरवठादाराचा शोध सुरू आहे. या विद्यार्थ्यांना ड्रग पुरवणारे आरोपी मुंबईबाहेरून ६ ते ७ टॅबलेट घेऊन आले होते. या प्रकरणातील मुख्य ड्रग्स विक्रेत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली आहे. मुख्य सूत्रधार आनंद पटेल याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर खडकपाडा पोलिसांनी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास कल्याणातील वायले नगरमध्ये धडक दिली. आनंद पटेलने सुरुवातीला दरवाजा उघडण्यास नकार देऊन पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
ड्रग्ज विक्रेत्यांना अटक
आतापर्यंत या कार्यक्रमाचा मुख्य आयोजक विहान उर्फ आकाश सामल, नेस्को सेंटरचा व्यवस्थापक सनी जैन, नेस्को सेंटरचा मुख्य सुरक्षा व्यवस्थापक बालकृष्ण कुरुप, ड्रग्ज पुरवठादार रौनक खंडेलवाल, कल्याण येथील मुख्य ड्रग्ज विक्रेता आनंद पटेल, ड्रग्ज विक्रेता प्रतीक पांडे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्ज व्यवहारात आणखी काही आरोपी सहभागी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळी उपस्थित असलेल्या बारा जणांचे सविस्तर जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी ६ ते ७ गोळ्या मुंबईबाहेरून आणल्या होत्या. दरम्यान, आरोपी आनंद पटेल याचा बाप लखन पटेल हा रेशन माफिया असून अनेक गुन्हे दाखल आहेत. हे ड्रग्ज शहरात कसे आले याचा शोध घेण्यासाठी पोलीस या प्रकरणाचे कनेक्शन तपासत आहेत. दरम्यान, रुग्णालयात दाखल असलेली शीतल साळवी आणि खंडेलवाल हे दक्षिण मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट स्टडीजच्या शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत.