मुंबई : ‘ज्ञानेश कुमार मस्ट गो’ असा इशारा दोन दिवसांपूर्वीच शिवार्जी पार्क येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चात देण्यात आल्यानंतर आता ठाकरे बंधूंनी बोलावलेल्या सर्वपक्षीय ‘गर्जना’ मोर्च्यातही मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची गर्जना झाली. राज्यात राबवण्यात आलेली एसआयआरची प्रक्रिया बेकायदेशीर असून राज्यातील एसआयआर रद्द झाला पाहिजे, अशी मागणीही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.
“एसआयआरच्या नावाखाली राज्यात जवळपास दोन कोटी तर संपूर्ण देशात १३ कोटी मतदार वगळले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकसंख्येएवढ्या लोकांना मतदार यादीतून बाहेर काढले गेले. जर बांगलादेशींच्या नावाखाली देशातील नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेणार असाल तर आम्ही आज पाऊल उचलले आहे, पण उद्या नाईलाजाने हात उचलावा लागेल,” अशा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती बेकायदेशीर
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीच्या पद्धतीवरही ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्या व्यक्तीवर संपूर्ण देशाच्या निवडणुकीची जबाबदारी आहे, त्यांची नियुक्तीच जर पक्षपाती पद्धतीने झाली असेल तर निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होणारच, असे ते म्हणाले. याआधी सरन्यायाधीश, पंतप्रधान, विरोधी पक्षनेते निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करायचे. मात्र, भाजप सरकारने सरन्यायाधीशांना वगळले आणि पंतप्रधानांचा प्रतिनिधी म्हणून अमित शहांना घुसवले. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्तीच बेकायदा आहे, असा दावा ठाकरे यांनी केला.
सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे !
उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली. भाजपला सरकार चालवता येत नाही. प्रशासन आणि भाजप हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. सरकार चालवणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. सरकारचे काम तटस्थपणे कायदा आणि सुव्यवस्था राखणे आहे,’ असे ते म्हणाले. महिलांवरील अत्याचार, कायदा-सुव्यवस्था आणि महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नांवरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे उदाहरण देताना छत्रपती संभाजीनगरमधील जिजाबाई कसाटे या शेतकरी महिलेच्या कुटुंबाचा उल्लेख त्यांनी केला. पीक हातातून गेल्यानंतर कर्जबाजारीपणामुळे तिच्या मुलांनी आत्महत्या केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या - राज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील एसआयआर रद्द करण्याची मागणी केली. “महाराष्ट्रात जो एसआयआर झाला, तो रद्द झाला पाहिजे. संपूर्ण देशात एकाच वेळी एसआयआर करणे बेकायदेशीर आहे. मोठी नैसर्गिक आपत्ती आली, मोठ्या तक्रारी आल्या तरच एसआयआर केले जाऊ शकते, अशी कायद्यात तरतूद आहे. जे काही एसआयआर सुरू आहे ते बेकायदेशीर आहे. आता यांनी २ कोटी मतदार बाहेर काढले आहेत. हे आमचे मतदार आहेत की कोण आहेत? देशात सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत,” अशी मागणी राज ठाकरेंनी केली.
राजीनामा झालाच पाहिजे- बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, “ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. ज्ञानेश कुमार हे एक प्रतीक आहे या भ्रष्ट कारभाराचे. २०१४ पासूनचा हा कालखंड काळा काळ म्हणून ओळखला जाईल. आता आपल्याला लोकशाही वाचवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.”