पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पावसाचा फटका; एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

पश्चिम रेल्वेवरील गाड्यांना पावसाचा फटका; एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

गुजरात आणि पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला.

Swapnil S

मुंबई : गुजरात आणि पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला. उमरगाव-घोलवड विभागात रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने राजधानी एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या आणि लोकल सेवा खोळंबल्या. रेल्वेगाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती दिली जात नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचले. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेस सकाळी ७.३५ वाजता बोरिवली स्थानकात येणे अपेक्षित होते. मात्र ही रेल्वेगाडी वडोदऱ्याजवळच थांबविण्यात आली. उमरगाव आणि पारडीदरम्यान रेल्वेमार्गाचे नुकसान झाल्याने रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. वडोदऱ्यानंतर विश्वामित्री स्थानकावर गाडी बराच वेळ थांबल्याने वडोदऱ्याहून प्रवास सुरू केलेल्या एका महिला प्रवाशाने प्रवास रद्द करून पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला.

प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या माहिती व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गाडीतील उद्घोषणा प्रणाली उपलब्ध असूनही विलंबाचे कारण, अपेक्षित सुटण्याची वेळ किंवा पर्यायी व्यवस्था याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली. राजधानी एक्स्प्रेसमध्ये भोजनाची व्यवस्था होईल, अशी अपेक्षा असली तरी इतर गाड्यांमधील प्रवाशांची परिस्थिती अधिक बिकट असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर, प्रवाशांना भोजन, खाद्यपदार्थ पुरवण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्चिम रेल्वेने काही रेल्वेगाड्या रद्द, पुनर्नियोजित; तसेच अल्प मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. भरूच-सुरत आणि वडोदरा-डहाणू रोड-वडोदरा या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सुरत-मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस-सुरत या रेल्वेगाड्यांचे प्रस्थान उशिराने करण्यात आले आहे. तसेच चर्चगेट-डहाणू रोड आणि डहाणू रोड-बोरिवली या लोकल सेवा वाणगावपर्यंत मर्यादित आल्या.

पश्चिम रेल्वेने सायंकाळपर्यंत आणखी सहा रेल्वे गाड्या रद्द केल्या. विरार-सुरत एक्स्प्रेस अल्प मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरात आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसला.

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये गोरखपूर-वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस नवापूर येथे, भुसावळ-दादर एक्स्प्रेस नंदुरबार येथे, एकता नगर-दादर एक्स्प्रेस अतुल येथे, तर १२९६२ इंदूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस वेडछा येथे अंशत: रद्द केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर

हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पालघर जिल्हाधिकारी यांनी आज शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने पालघर जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयाच्या विविध परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाल्याने पालघर जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. तसेच विद्यार्थी, महाविद्यालये आणि संबंधित सर्वांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकानी केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपाहारगृह सील; FDA ची कारवाई, १५ दिवसांसाठी परवाना रद्द 

Solapur : वारकरी झाले भावभक्तीत चिंब! बाजीराव विहिरीजवळ नेत्रसुखद रिंगण

ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्राचे शिक्षणच घेतले नाही; ईडीसमोर भोंदूबाबा खरातची कबुली

Mumbai : पालिका सभागृहातही पडसाद! ‘मोदी हाय हाय, विद्यार्थ्यांना न्याय द्या’; महापालिकेत विरोधकांची जोरदार घोषणाबाजी

CJP Protest : आज देशव्यापी आंदोलन; शांततापूर्ण सहभागाचे कॉकरोच पार्टीचे आवाहन