एकीकडे महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेलं आहेत. तर दुसरीकडे आता दुधाचे भावदेखील वाढवण्यात येणार आहेत. गोकुळ (Gokul Milk) म्हणजेच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दरामध्ये पुन्हा एकदा वाढ केली आहे. त्यांनी गायीच्या दुधामध्ये ३ रुपयांची वाढ केली असून आता त्याचे दर ५४ रुपयांवर पोहचले आहे. तर, अर्धा लिटरमागे २ रुपयांची वाढ केली आहे.
माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. या दरवाढीचा फायदा हा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून सर्वसामान्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. गेल्या ३ महिन्यांमध्ये गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात दुसऱ्यांदा वाढ केली. गोकुळने २७ ऑक्टोबरला गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली होती. मात्र, विक्री दरात वाढ केली नव्हती. सोमवारी मध्यरात्रीपासून त्यांनी विक्री दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ केली.