मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंगमधील गुंतवणुकीत भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांची लाखो रुपयांना फसवणूक करणाऱ्या टोळीच्या कॉल सेंटरवर छापा घालून चुनाभट्टी पोलिसांनी सोहल रफीक सोळंखी याला अटक केली. या कॉल सेंटरमधील लाखो रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली असून या रॅकेटमधील मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत.
शेअर ट्रेडिंगपेक्षा फॉरेक्स ट्रेडिंगमधील गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळवता येईल. असे सांगून गेल्या काही महिन्यांपासून अनेकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी मुंबई पोलिसांकडे येत होत्या. ही टोळी इच्छुक गुंतवणूकदारांना फॉरेक्स ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करावयास लावून त्याचे सबस्क्रिप्शन घ्यावयास लावत असे. त्या ॲपमध्ये गुंतवणूकदारांना त्यांची माहिती भरावयास लावून लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जाई. तेथे बँक खाते जोडून गुंतवणुकीची रक्कम जमा करावयास सांगितली जात असे.
त्यानंतर काही दिवसांनी ग्राहकांना नफा झाल्याचे सांगून आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले जात असे. इतके केल्यावर नफा काढून घेताना मात्र गुंतवणूकदारांना अडचणी येऊ लागल्या. आपले आयडी आणि पासवर्ड ब्लॉक करण्यात आल्याचे त्यांना आढळू लागले. त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले जात असे. मात्र लाखो रुपये गुंतवूनही आपला नफा त्यातून काढून घेता येत नसे.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर काही जणांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी जोगानी इंडस्ट्रीमधील या कंपनीच्या कार्यालयावर छापा घातला असता सोहेल रफीक सोळंखीसह आणखी तिघेजण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कॉल करत असल्याचे आढळले. या कॉल सेंटरमधून सहा कॉम्प्युटर, सहा लॅपटॉप, २७ मोबाइल फोन आणि अनेक सीमकार्ड जप्त करण्यात आली. नेरूळ येथे राहणारा सोळंखी इतर मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळल्याने त्याला अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार बाहेर राहून सोळंखीमार्फत ही बनावट कंपनी चालवत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे.
अशा प्रकारे फसवणूक कझाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी केले आहे.