मुंबई : मुंबईत दहीहंडीचा उत्साह काही औरच असून उंचच्या उंच थरांसह काही पथके सामाजिक, ऐतिहासीक संदेश देऊन लक्ष वेधून घेतात. दादर येथील आयडीयल दहीहंडी उत्सव यंदा छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा इतिहास सादर करणार आहेत. यावेळी दृष्टिहीन आणि दिव्यांग बांधवांचे पथक दहीहंडीचे आकर्षण ठरणार आहे. तसेच मिस्टर एशिया, - मिस्टर इंडिया यांसह सिनेकलावंताची उपस्थिती असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील आयडियल गल्लीत शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यापूर्वी शिवसागर गोविंदा पथकाकडून मानवी मनोरा रचताना विविध संकल्पनांवर आधारित देखाव्याचे सादरीकरण केले गेले आहे. यंदाही पथकाकडून तीन थर रचून चौथ्या थरावर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास मांडला जाणार आहे. या देखाव्याचे सादरीकरण सकाळी १०.३० वाजता सुरू होईल. या सादरीकरणातून महाराजांच्या शौर्याचा इतिहास सामाजिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक कंपनी (दादर) यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच श्री साई दत्त मित्र मंडळ आणि बाबू शेठ पवार व मित्र मंडळ यांच्या सहकार्याने "आयडियल सेलेब्रिटी व पर्यावरणपूरक दहीहंडी उत्सव २०२५" मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
महाराष्ट्रात महिला दहीहंडी, सेलेब्रिटी दहीहंडी आणि देखावा सादरीकरण दहीहंडीची सुरुवात आयडियच्या गल्लीत झाली. यंदाचे पुरुष दहीहंडीचे ५१ वे वर्ष, महिला-दहीहंडीचे ३२ वे वर्ष, सेलेब्रिटी दहीहंडीचे २३ वे वर्ष आणि देखावा सादरीकरण दहीहंडीचे ४ थे वर्ष आहे.
पथनाट्य सादरीकरण!
दशावतार हा कोकणातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक लोकनाट्य प्रकार आहे. तो विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे. यावर्षी देखील दोन स्टुडिओज प्रस्तुत 'दशावतार' चित्रपटातील कलाकार अभिनय बेर्डे, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर हे या दहीहंडीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठी सिनेसृष्टीमधील कलाकार मोठ्या संखेने उपस्थित राहतील, सोबत दरवर्षी प्रमाणे पर्यावरणपूरक सण कसे साजरे करावेत या विषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात येणार आहे.