एक्स @iitbombay
मुंबई

आता इंजेक्शन टोचणार, पण दुखणार नाही; सुईविरहित इंजेक्शनचा ‘आयआयटी मुंबई’कडून शोध

रुग्णाला झटपट आराम मिळण्यासाठी व औषध पटकन शरीरात जाण्यासाठी डॉक्टर रुग्णाला इंजेक्शन देतात. अनेक रुग्णांना इंजेक्शनचे नाव काढल्यावरच घाम फुटतो. इंजेक्शनची सुई पाहताच अनेकांची पाचावर धारण बसते.

Swapnil S

मुंबई : रुग्णाला झटपट आराम मिळण्यासाठी व औषध पटकन शरीरात जाण्यासाठी डॉक्टर रुग्णाला इंजेक्शन देतात. अनेक रुग्णांना इंजेक्शनचे नाव काढल्यावरच घाम फुटतो. इंजेक्शनची सुई पाहताच अनेकांची पाचावर धारण बसते. आता तुम्हाला इंजेक्शन टोचणार, पण दुखणार नाही. कारण सुईविरहित इंजेक्शनचा शोध ‘आयआयटी मुंबई’ने लावला आहे. या शोधामुळे कोट्यवधी रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

‘आयआयटी मुंबई’च्या हवाई अभियांत्रिकी विभागाचे प्रा. वीरेन मेन्सेझ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘शॉकवेव्हवर आधारित’ सी‌‌रिंज शोधून काढली आहे. ही सीरिंज त्वचेला धारदार सुईने छिद्र न करता औषधोपचार देते. ते द्रव औषधांचे मायक्रोजेट तयार करण्यासाठी उच्च-ऊर्जा शॉक वेव्ह वापरते. व्यावसायिक विमानापेक्षा दुप्पट वेगाने हे मायक्रोजेट शरीरातून प्रवास करते व त्वचेत वेगाने पसरते. पारंपरिक सुईपेक्षा ही प्रक्रिया त्वचेतून वेगवान होते.

भूलीसाठीच्या चाचण्या

शॉक सीरिंजने दिलेल्या भुलीचा परिणाम तीन ते पाच मिनिटांत सुरू झाला आणि तो २० ते ३० मिनिटे टिकला.

चिकट औषधे

बुरशीविरोधी उपचारासाठी शॉक सीरिंज त्वचेच्या खोल थरात जाते आणि औषधाचे परिणाम अधिक चांगले देते.

इन्सुलिन टोचणे

शॉक सीरिंजने उपचार केल्यावर मधुमेही उंदरांनी दीर्घ कालावधीसाठी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवली.

चाचण्यांद्वारे नवीन पद्धती प्रभावी

या नवीन सुईविरहीत इंजेक्शनच्या चाचण्या उंदरावर करण्यात आल्या. त्यांना शॉक सीरिंजद्वारे औषधे प्रभावीपणे देण्यात आली. काही वेळा पारंपरिक पद्धतीपेक्षा ही शॉक सीरिंज प्रभावी ठरली.

भविष्यात उपयुक्त ठरणार

या शॉक सीरिंजमुळे इंजेक्शन दिलेल्या जागी कमी जळजळ होते. तसेच रुग्णांना लवकरच आराम मिळण्यास मदत होते. शॉक सीरिंज पद्धती ही लसीकरणाच्या पद्धतीत क्रांती घडवणार आहे. यामुळे प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होणार आहे. या पद्धतीमुळे अनेक डोस देता येतील.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी; मिळणार ५०० चौरस फुटांचे घर, शासकीय भूखंडावरील अतिक्रमण धारकांना राज्य सरकारचा दिलासा

काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा