मुंबई : बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होडिॅग मुळे मुंबईचे विद्रुपीकरण होत आहे. राजकीय पक्षांच्या बॅनरबाजीवर नाराजी व्यक्त करत राजकीय पक्षांना नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले. दरम्यान, जानेवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत १९ हजार ८८५ राजकीय पक्षांचे बेकायदा पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज हटवण्यात आले. तर राजकीय पक्ष व व्यवसायिक पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्या ४१० जणांविरोधात विविध पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स झळकवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने याआधीही मुंबई महापालिकेला दिले आहेत. तरीही राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स व होर्डिंग्ज ठिकाणी ठिकाणी झळकतात. तसेच व्यवसायिक पोस्टर्स बॅनर्स अनधिकृतपणे लावले जात असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्ज पोस्टर्स बॅनर्स लावणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. १ जानेवारी २०२३ २० फेब्रुवारी २०२४ या १४ महिन्यांच्या कालावधीत पालिकेने धडक मोहिमेत तब्बल ५३ हजार ५७० होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्सवर कारवाई केली. यामध्ये व्यावसायिक ४,९३० धार्मिक ३७,८२२ व राजकीय १९ हजार ८८५ अशी एकूण ६२,६३७ होर्डिग्ज, बॅनर्स, पोस्टर्स हटवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१४ महिन्यांत
झालेली कारवाई
राजकीय 19,885
व्यावसायिक 4,930
धार्मिक 37,822
एकूण 62,637