बदलापूर पूर्वेकडील मच्छीमार्केट समोर एकापाठोपाठ एक अशी तीन झाडे कोसळून पडली. तेथून जाणाऱ्या एका रिक्षावर झाडाच्या फांद्या कोसळून रिक्षा चक्काचूर झाली. परंतु रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रिक्षा चालक व रिक्षातील प्रवासी महिलाही थोडक्यात बचावली आहे. मात्र पावसाळ्यापूर्वीच झाडे कोसळण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बदलापूर पूर्वेकडील मच्छी मार्केट समोरील तीन झाडांच्या मोठ्या फांद्या एकापाठोपाठ एक रस्त्यावर कोसळल्या. तसेच फांद्यांच्या वजनाने विजवाहक तारा तुटून विजेचे खांबही वाकले. त्यावेळी या रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षावर व मच्छी मार्केट परिसरात पार्क केलेल्या काही दुचाकींवर या मोठ्या फांद्या कोसळल्याने रिक्षा अक्षरशः चेपली गेली. त्यावेळी रिक्षा चालकाने कमालीचे प्रसंगावधान दाखवत रिक्षातील प्रवासी महिलेला बाहेर काढून स्वतःही रिक्षातून उडी घेत स्वतःचा व महिलेचा जीव वाचवला. सुनील कडाळे असे या रिक्षा चालकाचे नाव असून तो कोंडेश्वर येथे राहणारा आहे.
अग्निशमन दल पोहचण्यास उशीर
झाडे कोसळल्याबाबत माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यास अग्निशमन दलाला सुमारे अर्धा तास लागल्याचे व अवघ्या तीन ते चार कर्मचाऱ्यांसह अग्निशमन दलाची गाडी आल्याचे उपस्थितांनी सांगितले. या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत कटर व कोयत्याच्या सहाय्याने झाडांच्या फांद्या बाजूला केल्या. मात्र अग्निशमन दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
------