मुंबई

कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढवा मुख्यमंत्री शिंदे यांचे केंद्र सरकारला पत्र

प्रतिनिधी

मुंबई : केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यात नाफेडने कांदा खरेदी सुरू केली आहे. सध्या नाफेडच्या १३ खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी केला जात आहे, मात्र ही खरेदी केंद्र अपुरी पडत आहे. त्यामुळे राज्यात कांदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री यांना पत्र लिहून केली आहे.

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उमटले. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संतप्त आहे. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा प्रति क्विंटल २ हजार ४१० रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार नाफेडमार्फत राज्यात ही खरेदी सुरू झाली आहे. गुरुवारपर्यंत राज्यातील १३ कांदा खरेदी केंद्रांवर ५०० मेट्रिक टन कांदा खरेदी झाला आहे. २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा असल्याने या वेगाने कांदा खरेदी लवकर पूर्ण होणार नाही. तसेच खरेदी केंद्र कमी असल्याने या केंद्रांवर कांदा विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे कांदा खरेदी केंद्र वाढवावी, अशी विनंती मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे. कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त