मुंबईहून नाशिकला जाण्यासाठी ज्येष्ठ डॉक्टर ए.के.पठाण यांनी ऑनलाइन कॅब बूक केल्यानंतर 'जय श्री राम' म्हटले तरच बूकिंग स्वीकारेन, असा मेसेज कॅब ड्रायव्हरने त्यांना पाठवल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 'फ्री प्रेस जर्नल'ने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर कॅब कंपनी InDrive ने डॉक्टर पठाण यांची माफी मागितली आहे.
InDrive मोबाईल ॲप अधिकाऱ्यांनी डॉ. पठाण यांना फोन केला आणि राईड स्वीकारताना कॅब चालकाच्या असहिष्णुतेबद्दल आणि अन्य धर्मांबद्दलच्या असंवेदनशीलतेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
“इनड्राईव्हच्या अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि चालकावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच, चालक आणि वाहतूक भागीदारांना सहिष्णुता आणि इतर धर्मांचा आदर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातील असेही आश्वासन दिले, असे डॉ. पठाण यांनी सांगितले.
नेमकं काय घडलं?-
ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ पठाण यांना गेल्या आठवडाअखेरीस एका लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी नाशिकला जायचे होते. त्यांनी इनड्राइव्ह ॲपद्वारे कॅब बूक केली. त्यानंतर हाजी अली येथून पिकअप करावे असा मेसेज त्यांनी चालकाला केला. त्यावर, "सर, मी रामभक्त सनातनी आहे. जय श्री राम बोलावं लागेल तरच कन्फर्म करतो", असा मेसेज चालकाने त्यांना पाठवला. डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि मोबाईल ॲपद्वारे इनड्राईव्हच्या सपोर्ट सेंटरला घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर चालकाने त्यांचे बूकिंग कॅन्सल केले होते. "यातून समाजातील वाढती असहिष्णुता दिसून येते. विविध समुदायांमध्ये समजूतदारपणा आणि स्वीकृती वाढवणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे", असे डॉ. पठाण म्हणाले. 'जय श्री राम' किंवा इतर कोणत्याही धर्माच्या घोषणांची अडचण नाही, पण त्याची सक्ती केली जाऊ नये, असेही ते म्हणाले.