मुंबई

‘बेस्ट’चा इंगा; कॉसिस कंपनी नरमली, डबलडेकर बसेस पुरवठा करण्यास तयार

बसेसचा पुरवठा करण्यात चालढकल करणाऱ्या कॉसिस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पालिकेने दिला होता

प्रतिनिधी

मुंबई : ‘बेस्ट’ने इंगा दाखवल्यानंतर आता वातानुकूलित इलेक्ट्रिक ७०० डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याचे कॉसिस कंपनीने मान्य केले आहे. वेळोवेळी विचारणा करूनही डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात चालढकल करणाऱ्या कॉसिस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा पालिकेने दिला होता. त्यामुळे कॉसिस कंपनी या दणक्यानंतर नरमली असून त्यांनी लवकरात लवकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

बेस्ट बसेस म्हणजे मुंबईची दुसरी लाईफलाईन. त्यात डबलडेकर बसेस प्रवाशांचे आकर्षण. मात्र जुन्या डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने कालांतराने डबलडेकर बसेस बेस्टच्या ताफ्यातून सेवानिवृत्त झाल्या. परंतु मुंबईची शान असलेल्या डबलडेकर बसेस कायम सेवेत राहाव्यात, यासाठी पर्यावरणपूरक ९०० इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असता, स्विच मोबॅलिटी आणि कॉसिस कंपनीने प्रतिसाद दिला. ९०० इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसपैकी २०० बसेस स्विच मोबॅलिटी कंपनीने पुरवण्याची तयारी दर्शवली. तर ७०० इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्याची तयारी कॉसिस कंपनीने दर्शवली. मात्र मध्यंतरीच्या काळात दोन्ही कंपन्यांकडून बसेसचा पुरवठा करण्यात उशीर झाला आणि दोन्ही कंपन्यांना समज देण्यात आली. त्यानंतर स्विच मोबॅलिटी कंपनीने २०० पैकी ४७ डबलडेकर बसेसचा पुरवठा केला असून टप्याटप्याने उर्वरित बसेसचा पुरवठा कंपनीकडून करण्यात येणार आहे. मात्र इलेक्ट्रिक वातानुकूलित डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यात चालढकल करणाऱ्या कॉसिस कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देताच, ७०० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसेसचा पुरवठा करण्यास कंपनीने होकार दिल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

ओलेक्ट्राच्या १० बसेस दाखल !

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक बसेस घेण्यास प्राधान्य दिले आहे. २,१०० इलेक्ट्रिक एक मजली बसेस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असता, ओलेक्ट्रा कंपनीने प्रतिसाद दिला. ओलेक्ट्रा कंपनीच्या बसेस येण्यास विलंब झाला असला तरी या कंपनीच्या १० बसेस दाखल झाल्या असून आरटीओच्या मंजुरीनंतर प्रवासी सेवेत येतील, असा विश्वास विजय सिंघल यांनी व्यक्त केला.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

ठाकरेंचे वलय संपले का?