मुंबई : काँग्रेसचे नेते मिलिंद देवरांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नसल्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. “न रुके थे, न रुके हैं और न रुकेंगे!” असे लिहित काँग्रेसच्या वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. “रविवारपासून सुरू होणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेला घेऊन भाजप आणि त्यांच्या फुटीर सहकारी पक्षांची घाबरगुंडी उडालेली आहे. ते इतके घाबरले आहेत की, साम-दाम-दंड-भेद अशा सर्वांचा वापर करून यात्रेपासून लक्ष भटकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे हे डावपेच आधी कामी आले नव्हते आणि आताही कामी येणार नाहीत. द्वेषाचे राजकारण करून लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीविरुद्धचा जनतेचा लढा आम्ही जिंकून दाखवू,” असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“इंग्रजांना काँग्रेस घाबरले नाही तर यांना काय घाबरणार. ज्याप्रमाणे जुलूमी इंग्रजांविरुद्ध निधड्या छातीने काँग्रेस लढले होते, त्याचप्रमाणे आजच्या हुकूमशाहीविरुद्धही निर्भीडपणे लढेल आणि जिंकेल,” असा विश्वास त्यांनी यावेळी केला. “ज्यांना काँग्रेसने खूप काही दिले, ज्यांना विविध पदांवर बसवले, खासदार बनवले, केंद्रीय मंत्री केले, त्यांनी संधी पाहून अडचणीच्या काळात पक्षाची साथ सोडली. परंतु कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही. असा थेट हल्ला गायकवाड यांनी मिलिंद देवरा यांच्यावर केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेला सत्ताधारी घाबरले -पटोले
१४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला भाजप आणि त्यांचे सहकारी पक्ष घाबरले आहेत. त्यामुळेच लोकांचे या यात्रेपासून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांसारख्या केंद्रीय संस्थांची भीती दाखवून आमच्या काही सहकाऱ्यांना आपल्याबरोबर घेत आहेत. काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी दोनवेळा पराभूत झालेल्या उमेदवाराला आपल्याबरोबर घेऊन ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या शुभारंभावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. या यात्रेची समाप्ती मुंबईतच होणार असून यात्रेच्या समाप्तीबरोबर असंवैधानिक शिंदे भाजप सरकारचाही शेवट होणार आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.