भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार ओठांचे चुंबन घेणे आणि प्रेमाने स्पर्श करणे हे अनैसर्गिक नाही, असे मत मुंबई हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
हायकोर्टाने हे मत व्यक्त करताना एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांनी एका आरोपीची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. १४ वर्षीय मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर गेल्या वर्षी या आरोपीला अटक करण्यात आली होती.
एफआयआरनुसार, मुलाच्या वडिलांना त्यांच्या कपाटातून पैसे गायब झाल्याचे आढळले. त्या मुलाने आरोपीला पैसे दिल्याचे सांगितले. ऑनलाइन गेम 'ओला पार्टी'साठी रिचार्ज करण्यासाठी तो मुंबईतील उपनगरातील आरोपीच्या दुकानात जात असे, असे या अल्पवयीन मुलाने सांगितलं.
मुलाने आरोप केला आहे की, एके दिवशी तो रिचार्ज करण्यासाठी गेला. तेव्हा आरोपीने त्याच्या ओठांचे चुंबन घेतले आणि त्याच्या ‘प्रायव्हेट’ पार्टला स्पर्श केला. त्यानंतर, मुलाच्या वडिलांनी बाल लैंगिक गुन्ह्यांचे संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ च्या संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल केला.
न्यायमूर्ती प्रभुदेसाई यांनी आरोपीला जामीन मंजूर करताना सांगितलं की, मुलाची वैद्यकीय तपासणी लैंगिक शोषणाच्या आरोपाला समर्थन देत नाही. ते म्हणाले की, आरोपीच्या विरोधात लावलेल्या पोस्कोच्या कलमांतर्गत जास्तीत जास्त पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते आणि त्याला जामीन मिळू शकतो.
न्यायालयाने म्हटले की, सध्याच्या प्रकरणात अनैसर्गिक लैंगिक संबंध ही बाब प्रथमदर्शनी लागू नाही. आरोपी आधीच एक वर्षापासून कोठडीत आहे आणि खटला लवकर सुरू होण्याची शक्यता नाही. वरील वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेता, अर्जदाराला जामीन मिळण्याचा अधिकार आहे." यासह, आरोपीला ३० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.