मुंबई: अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर जे. जे. रुग्णालयावर धाडसी कारवाई करत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे काम केले आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन केले जाते आणि त्या रक्तातून प्लाझ्मा, पांढऱ्या रक्तपेशींसह विविध महत्त्वाचे घटक वेगळे केले जात असले तरी त्याची हेळसांडच होत असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने सावध पावले टाकावीत आणि रुग्णांना सुरक्षित रक्तघटक उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
अनेक गंभीर आजारांमध्ये आणि विशेषतः भाजलेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये प्लाझ्माची आवश्यकता रक्तापेक्षाही अधिक असते. अशा गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे रक्तघटक संकलित करून जतन केले जातात. मात्र, जर त्यांची अशी दुर्दशा शासकीय रुग्णालयांमध्ये होत असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब आहे.
दर्जेदार, सुरक्षित आरोग्य सेवा हे पालिकेचे कर्तव्य
बृहन्मुंबई महानगरपालिका रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे, हे मान्य असले तरीही नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा देणे हेच आपले कर्तव्य आहे. जर कोणत्याही रुग्णालयाने या बाबतीत निष्काळजीपणा केला असेल, तर त्यामध्ये संबंधित विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांचीही जबाबदारी निश्चित केली पाहिजे. अशा सर्व निष्काळजी आणि बेफिकीर वृत्तीचा पेडणेकर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचे हृदय
जे. जे. रुग्णालय हे केवळ एक रुग्णालय नसून संपूर्ण मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचे हृदय आहे. लोकांनी उदात्त भावनेतून, समाजसेवेच्या हेतूने दिलेल्या रक्ताची आणि त्यापासून तयार होणाऱ्या जीवनदायी घटकांची जर अशी हेळसांड होत असेल, तर हा त्या उदात्त भावनेचाही अपमान आहे. अशा निष्काळजीपणाबद्दल राज्य सरकारचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे, अशा शब्दांत पेडणेकर यांनी टीका केली.
आता तरी सावध व्हावे!
मुंबई महापालिकेचीही पाच मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्येही नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात आणि रक्तापासून आवश्यक घटक वेगळे करून साठवले जातात. किमान जे. जे. रुग्णालयातील ही परिस्थिती पाहून तरी आता सर्व संबंधितांनी सावध होण्याची गरज आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हे रक्तघटक योग्य पद्धतीने आणि सुरक्षितरीत्या जतन केले जात असतील, अशी मला अपेक्षा आहे.