मुंबई : ओमायक्राॅनचा उपप्रकार जेएन व्हेरियंटचे नवीन १९ रुग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. दरम्यान, ८ जानेवारी रोजी २२ रुग्ण आढळले होते. कोरोना बाधित रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग पाठवले होते. जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने आकडेवारी जारी केली आहे. दरम्यान, मुंबईत याआधी २२ तर आता १९ रुग्ण आढळल्याने जेएन व्हेरियंटचा मुंबईला विळखा बसला आहे.
देशात जेएन व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होत असून काही रुग्ण दगावले आहेत. राज्यातही जेएन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत राज्यात २५० जेएन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. तर पालिकेच्या आरोग्य विभागाने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार १९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ४ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. तर मुंबईतील १५ जेएन व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असून यापैकी चार बाधित रुग्ण सह व्याधींनी त्रस्त आहेत.
दरम्यान, जेएन व्हेरियंटचा प्रसार झपाट्याने होत असला तरी घाबरण्याची गरज नाही. ताप खोकला सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.