मुंबई

Mumbai : जुहू तारा रोडवरील उघड्या गटारांची धोकादायक अवस्था उघड; व्हायरल व्हिडिओनंतर BMCची दखल

व्हायरल व्हिडिओमध्ये जुहू तारा रोडवर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली किंवा पूर्णपणे उघडी असल्याचे दिसते.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईतील जुहू तारा रोडवरील तुटलेली आणि उघडी गटारे पुन्हा चर्चेत आली आहेत. सोशल मीडियावर यासंबंधीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सचिन पाटणकर या युजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जुहू तारा रोडवर अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटलेली किंवा पूर्णपणे उघडी असल्याचे दिसते. किमान चार ते पाच ठिकाणी ही धोकादायक परिस्थिती असल्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये युजरने पालिकेच्या निष्काळजीपणावर टीका करत, "जुहू तारा रोडची ही अवस्था का आहे? BMC अधिकारी कारवाई का करत नाहीत? अपघात झाल्यास जबाबदार कोण?" असा सवाल उपस्थित केला. तसेच, सांताक्रूझ पूर्व भागातही गेल्या सहा महिन्यांपासून अशाच समस्यांबाबत तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. नागरिकांकडून कर वसूल करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची नाराजी पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.

BMCचा प्रतिसाद

या प्रकरणाची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिकेने नागरिकांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. संबंधित H/West विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

मात्र, पाटणकर या युजरने पालिकेच्या या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक वेळी तक्रारीनंतर उत्तर दिले जाते, पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा दावा त्याने केला आहे.

या घटनेमुळे जुहू आणि सांताक्रूझ परिसरातील पायाभूत सुविधांच्या स्थितीबाबत नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Mumbai : वरळीत महागडा भाडेकरार; दरमहा २८.५ लाख रुपयांचे भाडे

Mumbai : एनटीसी गिरणी कामगारांचा आत्महत्या करण्याचा इशारा; कामगारांना पगार व पेन्शनची प्रतीक्षा

Mumbai : अतिक्रमणांवर महापालिकेचा हातोडा; साकीनाका, पवईत 'पादचारी प्रथम' अभियानांतर्गत एल विभागाची कारवाई

यंदा व्याजदर वाढ? वाढत्या महागाईमुळे रिझर्व्ह बँक पतधोरणात बदल करणार

ICC World Cup 2027 : खेळाडूंच्या दुखापती, व्यस्त वेळापत्रकामुळे सर्वोत्तम संघ निवडणे कठीण - गिल