खोपोली-सीएसएमटी लोकल दादरपर्यंतच; प्रवाशांचे हाल, पूर्ववत सेवा सुरू करण्याची मागणी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

खोपोली-सीएसएमटी लोकल दादरपर्यंतच; प्रवाशांचे हाल, पूर्ववत सेवा सुरू करण्याची मागणी

संबंधित महिला प्रवाशांनी बुधवारी (दि.१९) दुपारी ३ वाजता सीएसएमटी येथील टीसी कार्यालयात लेखी निवेदन दिले. या निवेदनातून लोकल पूर्वीप्रमाणे सीएसएमटीपर्यंत सुरू करावी, तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार करून आधीची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Krantee V. Kale

खोपोलीहून पहाटे सुटणाऱ्या खोपोली-सीएसएमटी लोकलच्या मार्गात करण्यात आलेल्या बदलामुळे नियमित प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक वर्षांपासून या लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

खोपोलीहून सकाळी ४.५० वाजता सुटणारी ही लोकल साधारण सकाळी ७ वाजेपर्यंत सीएसएमटी स्थानकात पोहोचत होती. या गाडीने खोपोलीसह कर्जत परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार, महिला आणि इतर प्रवासी दररोज मुंबईकडे प्रवास करतात.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पूर्वी १२ डब्यांची असलेली ही लोकल १५ डब्यांची करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या म्हणण्यानुसार १५ ऑगस्टपासून ही लोकल सीएसएमटीपर्यंत न नेता दादर येथेच थांबवण्यात येत आहे. या बदलाबाबत पुरेशी पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचाही प्रवाशांचा आरोप आहे.

दादरमध्ये प्लॅटफॉर्म बदलण्याची कसरत

लोकल दादरपर्यंतच धावत असल्याने सीएसएमटीकडे जाणाऱ्या प्रवाशांना दादर येथे उतरून प्लॅटफॉर्म बदलावा लागतो आणि पुढील स्लो लोकल पकडावी लागते. गर्दीच्या वेळेत सामानासह प्लॅटफॉर्म बदलणे विशेषतः महिला आणि ज्येष्ठ प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

काही प्रवासी दादरचा अतिरिक्त त्रास टाळण्यासाठी कुर्ला स्थानकातच उतरून पुढे स्लो लोकलने सीएसएमटी गाठत आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून रोजच्या कामावर पोहोचण्यासही विलंब होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

१५ डब्यांची लोकल, मात्र प्रवाशांना फायदा काय?

या मार्गावर प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी लोकल १५ डब्यांची करूनही ती सीएसएमटीपर्यंत न नेल्याने त्याचा अपेक्षित फायदा होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली थेट सेवा अचानक दादरपर्यंत मर्यादित केल्याने रोजच्या प्रवासात अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला प्रवाशांचे लेखी निवेदन

या संदर्भात संबंधित महिला प्रवाशांनी बुधवारी (दि.१९) दुपारी ३ वाजता सीएसएमटी येथील टीसी कार्यालयात लेखी निवेदन दिले. या निवेदनातून लोकल पूर्वीप्रमाणे सीएसएमटीपर्यंत सुरू करावी, तसेच प्रवाशांच्या सोयीचा विचार करून आधीची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात १५ डब्यांची लोकल करूनही ती दादरपर्यंतच मर्यादित असल्याने प्रवाशांना त्याचा पुरेसा फायदा मिळत नसल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. रोजच्या प्रवासात महिलांसह इतर प्रवाशांना होणाऱ्या अडचणींची माहिती देत पूर्वीप्रमाणे थेट सीएसएमटी सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

रेल्वेकडून कारवाईचे आश्वासन

महिला प्रवाशांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाकडून ते रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

“आम्ही अनेक वर्षांपासून या गाडीने प्रवास करत आहोत. अचानक दादरपर्यंतच सेवा केल्यामुळे रोजचा प्रवास अधिक कठीण झाला आहे. मध्य रेल्वेने आमची अडचण लक्षात घेऊन ही लोकल पुन्हा सीएसएमटीपर्यंत सुरू करावी,” अशी मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

Dombivli : पादचारी पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई; गर्दुल्ले, भिकाऱ्यांना पालिकेने हटवले

Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक