मुंबईच्या वांद्रे पूर्व भागातील बेहराम नगरमधील हॉटेलमध्ये एका व्यक्तीवर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हॉटेलमधील सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याचा हा थरार कैद झालाय. घटनेनंतर हल्लेखोराला ताबडतोब अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी असताना अचानक एका व्यक्तीने दुसऱ्या तरुणावर चाकूने हल्ला केला. अचानक झालेल्या घटनेने गोंधळ उडाला, पण लगेचच अन्य ग्राहकांनी आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी धाव घेत सपासप वार करणाऱ्या आरोपीला रोखले. सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने पोहोचले आणि आरोपीला अटक केली. पोलिस उपायुक्त (झोन ८) यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) च्या कलम ११८(२), ३५१(२) आणि ३५२ अंतर्गत निर्मलनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ला झालेल्या व्यक्तीच्या खांद्याच्या खाली दुखापत झाली आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आधीपासून दोघांमध्ये काही वैर होते का याचाही पोलिसांकडून तपास सुरू आहे.