मुंबई

कुर्ल्यातील बस अपघाताला चालकच जबाबदार; सत्र न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Kurla BEST bus accident : गेल्या महिन्यात कुर्ला येथे जवळपास ५० जणांना चिरडणाऱ्या बेस्ट बसचालक संजय मोरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या महिन्यात कुर्ला येथे जवळपास ५० जणांना चिरडणाऱ्या बेस्ट बसचालक संजय मोरे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. बेस्ट बस अपघाताला संजय मोरे हाच जबाबदार आहे. संजय मोरे हा बेस्टची बस बेफिकीर आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्या गाडीत काही बिघाड झाला होता, हे मानता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवत मोरेचा जामीनअर्ज फेटाळला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विवेकानंद पाताडे यांनी आरोपी बसचालक संजय मोरेचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला. त्या निकालाचे सविस्तर आदेशपत्र मंगळवारी संकेतस्थळावर उपलब्ध झाले. त्या आदेशपत्रात न्यायालयाने आरोपी बसचालकाच्या बेफिकीरपणावर शिक्कामोर्तब केले. अपघातग्रस्त बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळेच बस अपघात झाला, हा आरोपी मोरेच्या वकिलांनी केलेला दावा मान्य करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

बसच्या खराब देखभालीमुळे किंवा ब्रेक निकामी झाल्यामुळे किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला, असा मोरेचा दावा असला तरी या युक्तिवादाला प्रथमदर्शनी समर्थन देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जारी केलेल्या अहवालात प्रथमदर्शनी बसमध्ये कोणताही यांत्रिक दोष नसल्याचे दिसून आले आहे. ही बाबदेखील न्यायालयाने गांभीर्याने विचारात घेतली.

कुर्ल्यातील मुख्य रस्त्यावर झालेल्या बस अपघातामुळे केवळ बसमधील प्रवाशांचेच नव्हे, तर वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या प्रवाशांचाही जीव धोक्यात आला. बसमध्ये अनेक प्रवासी असतानाही मोरेने अतिशय बेजबाबदारपणे आणि निष्काळजीपणे बस चालवली, असेही सत्र न्यायाधीश पाताडे यांनी आपल्या सविस्तर आदेशपत्रात नमूद केले आहे.

न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानला

९ डिसेंबर रोजी बेस्टच्या भरधाव एसी बसने अनेक पादचाऱ्यांना चिरडले आणि कित्येक वाहनांना धडक दिली. या अपघातात ९ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाले. याप्रकरणी बसचालक संजय मोरेला अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याचदरम्यान त्याने अ‍ॅड. समाधान सुलाने यांच्यामार्फत सत्र न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. कुर्ला पोलिसांनी मोरेच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला होता. यावेळी न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य मानला.

भारताला २०३०च्या राष्ट्रकुलचे यजमानपद; अहमदाबादची आयोजनासाठी निवड; लवकरच अधिकृत घोषणा

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिकचा कहर! तब्बल १२ तास अडकले हजारो लोकं, २० पेक्षा जास्त शाळांच्या पिकनिक रद्द

अल्पसंख्याक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक बंधनकारक! शाळांची मान्यता रद्द करण्याचा क्रीडामंत्री कोकाटे यांचा इशारा

नेस्कोच्या जमिनीचे अधिग्रहण रद्द; हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका