'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : सायन प्रतीक्षानगरमध्ये जमीन खचली; SRA कडून विकासकाला नोटीस - विकासकांकडून सुरक्षेच्या उपाययोजना

म्हाडाच्या सायनच्या प्रतीक्षानगर वसाहतीलगत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेतील विक्री घटकाच्या इमारतीचे काम सुरू असून बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन खचल्याची घटना घडली.

Swapnil S

मुंबई : म्हाडाच्या सायनच्या प्रतीक्षानगर वसाहतीलगत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) योजनेतील विक्री घटकाच्या इमारतीचे काम सुरू असून बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जमीन खचल्याची घटना घडली. यामुळे म्हाडा वसाहतींतील इमारतींच्या संरक्षक भिंतींना आणि पायाला तडे गेले आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबद्दल एसआरएकडून विकासकाला नोटीस देण्यात आली असून विकासकाने सुरक्षेच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

प्रतीक्षा नगरमधील म्हाडा वसाहतीलगत मोठी झोपडपट्टी होती. या झोपडपट्टीचा पुनर्विकास एका विकासकाने पूर्ण केला असून आता येथे विक्री घटकाच्या इमारतीचे काम सुरू आहे. इमारत उभारण्यासाठी आवश्यक असलेले १५ ते १८ लोखंडी संरक्षक भिंत (शीट पाइल्स) निकामी झाल्यामुळे जमिनीचा भाग खचला. यामुळे लगतच्या म्हाडा वसाहतींतील इमारतींच्या संरक्षक भिंतींना आणि पायाला तडे गेले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेनंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी करून बांधकाम थांबविण्याची मागणी केली. तसेच विकासकावर कारवाई करावी अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. विकासकाने नियमांचे पालन न करता निष्काळजीपणे काम केल्यामुळे ही घटना झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.

याबाबत म्हाडाने तातडीने खुलासा करत हे प्रकार एसआरएशी संबंधित असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यानुसार प्रतीक्षानगर-टप्पा ५ येथे भूस्खलन झाले असून ‘एसआरए’शी संलग्न कंत्राटदाराच्या निष्काळजीमुळे घटना घडल्याचे म्हटले आहे. शीट पाइल्समधील अंतरामुळे संरक्षक भिंतीलगत जमीन खचत असल्याची बाब यापूर्वीच ‘एसआरए’च्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. कामाच्या ठिकाणी जमीन खचली असून लगतच्या म्हाडा वसाहतींतील इमारतींच्या संरक्षक भिंतीना तडे गेले असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

विकासकाला एसआरएकडून नोटीस

एसआरए प्रकल्पातील विक्री घटकातील इमारतीचे काम सुरू होते. येथे लोखंडी संरक्षक भिंत (शीट पाइल्स) घालण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, त्यापैकी सुमारे १५ ते १८ शीट पाइल्समधील अंतर अधिक असल्याने जमीन खचली. याची गंभीर दखल घेत संबंधित विकासकाला तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याप्रमाणे विकासकाने तातडीने येथे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती ७० टक्के कामे पूर्ण केली आहेत. तसेच पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन या घटनेची तपासणी करून याचा अहवाल एसआरएला सादर करावा, अशी नोटीस विकासकाला देण्यात असल्याचे एसआरएतील अधिकाऱ्याने सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बोरघाटातील दुसरी लाईन दुरुस्त; आजपासून डेक्कन क्वीन, इंटरसिटी धावणार

उंच पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जन नको! परवानगी न देण्यासाठी हायकोर्टाला साकडे

नवी मुंबई जागतिक हवाई नकाशावर; अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानाचे ऐतिहासिक आगमन

जन्मदाखल्यात बदल करण्याचा पालिकेला अधिकार; विश्वासार्ह पुराव्यांची आवश्यकता - हायकोर्ट

थकीत वीजबिले माफ; शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, दिवसा मिळणार १२ तास मोफत वीज