मुंबई : मेट्रो -३ ही राज्याच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे. यापूर्वी मेट्रो -३ प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे आरे-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मार्गावरील मेट्रोच्या रिकाम्या डब्याची चाचणी म्हणजे 'ड्राय रन' करण्यात आली होती. त्यावेळी मेट्रोचा वेग ९५ किमी प्रतितासपर्यंत होता.
पुढील आठवड्यात 'लोडेड ट्रायल्स' सुरू करण्याची अपेक्षा आहे. यात मेट्रोच्या आठ कोचमध्ये प्रवाशांच्या वजनाच्या बारिक दगडाने भरलेल्या पिशव्या ठेवण्यात येतील. या चाचणीतून प्रवाशांच्या वजनाने भरलेली मेट्रो मार्गावर कशा पद्धतीने धावते, हे पाहणार आहेत. या व्यतिरिक्त मेट्रोच्या चाचणीदरम्यान सरळ ट्रॅक आणि वळणदार ट्रॅक यासारख्या गोष्टी देखील बघितल्या जातील.
सरकारी अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाईम्स दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्यापूर्वी सर्व अडथळे दूर करणार आहोत. जेणे करून मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना कोणाताही त्रास होणार नाही. या सर्व चाचण्या झाल्यानतंरही रिसर्च डिझाइन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) आणि कमिश्नर फॉर मेट्रो सेफ्टी (CMRS) या सर्वांच्या मापदंडांची पुर्तता करणेही तितकेच महत्वाचे असते, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.
भारतात पहिल्यांदाच ७५ टक्के मोटर असलेली आठ कोचची मेट्रो धावणार आहे. तर इतर मार्गावरील मेट्रो ५० टक्के मोटर्सवर धावणार आहेत. मेट्रो ३ चे काम जवळपास ९६ टक्के पूर्ण झाले असून केवळ स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम बाकी आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने दिलेल्या माहितीनुसार, भुयारी मेट्रो तयार झाल्यानंतर, १७ लाख प्रवाशांची पूर्तता करेल. बीकेसी ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंतचा मेट्रोचा दुसरा टप्पा देखील प्रगतीपथावर आहे. या टप्प्यातील मेट्रो ही ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन (ATO) मोडवर चालणारी मेट्रो असणार आहे. ही मेट्रो तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविणारी असणार आहे.
मेट्रोचे काम वेळेत पूर्ण होणार
आरे-बीकेसी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी जवळपास ३७,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आरे-बीकेसी मेट्रोचा पहिला टप्पा हा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. यानंतर बीकेसी ते कफ परेडपर्यंतचा दुसरा टप्पा या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. सीप्झ ते बीकेसी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात ८ स्थानके असतील आणि बीकेसी-कफ परेड दरम्यान १८ स्थानके असणार आहे.