मुंबई

वर्षा गायकवाड VS उज्ज्वल निकम ; उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात चुरस वाढली

भाजपने ऐनवेळी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

भाजपने ऐनवेळी उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसच्या उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपने निकम यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. दिवस कमी असल्याने निकम यांनी रविवारपासून आपल्या प्रचाराचा नारळही फोडला.

उज्ज्वल निकम यांनी गुन्हेगारी विषयक अनेक खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. १९९३ साली मुंबईत झालेला साखळी बॉम्बस्फोट, गुलशन कुमार यांची हत्या, खैरलांजी हत्याकांड, शक्ती मिल बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या, मुंबईवरील २६/११ चा हल्ला व त्यातील प्रमुख आरोपी कसाबची फाशी असे महत्वाचे खटले निकम यांनी लढविले आहेत. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. निकम यांच्या एन्ट्रीने या मतदारसंघातील चुरस आता वाढली आहे. आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा पाच महिलांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. विविध पक्षाच्या या महिला नेत्यांच्या मागे हा मतदारसंघ उभा राहिला आहे. वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे.

या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. वांद्रे पश्चिममधून भाजपचे आशीष शेलार तर वांद्रे पूर्वमध्ये काँग्रेसचे झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. विलेपार्लेमधून भाजपचे पराग अळवणी, चांदिवली मतदारसंघातून शिवसेनेचे दिलिप लांडे, कुर्ल्यातून शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आणि कलिनामधून शिवसेनेचेच संजय पोतनीस विजयी झाले होते. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीत पाच मतदारसंघ युतीसोबत आहेत. झिशान सिद्दिकी यांचे वडिल व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांनी नुकताच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तरमध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. आतापर्यंत त्यांनी दोनवेळा याच मतदारसंघातून विजय मिळविला आहे; मात्र, मतदारसंघात कार्यकर्त्यांची त्यांच्या विरोधात असलेली नाराजी पाहून महाजन यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. आधी निकम यांचे नाव जळगावसाठी चर्चेत होते. जळगाव हा निकम यांचा गृहजिल्हा आहे; मात्र भाजपने तिथून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. उत्तरमध्य मुंबईसाठी आधी आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते; मात्र त्यांना राज्याच्याच राजकारणात रस असल्याने त्यांचे नाव मागे पडले.

हा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. सर्वधर्मीय मतदार या मतदारसंघात राहतात. आतापर्यंत या मतदारसंघाने काँग्रेस, जनता पार्टी, कम्युनिस्ट पार्टी, शेडयुल कास्ट फेडरेशन, भाजप, शिवसेना अशा सर्वच पक्षांच्या पारडयात आपली मते टाकली आहेत. रोझा देशपांडे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशा पाच महिलांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. वर्षा गायकवाड यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. वर्षा गायकवाड यांचा धारावी हा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात येत नाही. निकम हे तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत. त्यामुळे दोन्हीही महत्वाचे उमेदवार हे या मतदारसंघासाठी नवीनच आहेत.

दोघेही उमेदवार तुल्यबळ

उज्ज्वल निकम हे राजकारणात नवीन असले, तरी वकील म्हणून त्यांनी जोरदार कामगिरी बजावली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ असल्याने तसेच हायप्रोफाईल खटल्यांमुळे प्रसारमाध्यमांशी तसेच सभेत कसे बोलायचे यावर त्यांचे प्रभुत्व आहे. वर्षा गायकवाड या सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केल्याचाही त्यांना अनुभव आहे. त्यामुळे दोघेही उमेदवार हे तुल्यबळ आहेत. या दोघांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात चुरशीचा सामना रंगणार आहे.

मुंबईतून तीन विद्यमान खासदारांना नारळ

पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांची विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी गमावली आहे. भाजपने आतापर्यंत मुंबईतून तीन विद्यमान खासदारांना नारळ दिला आहे. भाजपने आपल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत मुंबईतील गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) आणि मनोज कोटक (उत्तर पूर्व मुंबई) या दोन विद्यमान खासदारांना तिकिट नाकारले होते. आता उत्तरमध्य मुंबईत पूनम महाजन यांना देखील नारळ देण्यात आला आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?