मुंबई : तांत्रिक करणीच्या सहाय्याने प्रेमातील अडथळा दूर करण्याचे करण्याचे आश्वासन इन्स्टाग्रामवरून तरुण-तरुणींना देत त्यांच्याकडून लाखो रुपये हडपणाऱ्या दोघा आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी राजस्थानातून अटक केली.
हे रॅकेट उघडकीस आले ते पायधुनी येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून घरफोडीच्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना. तहावीन इराकी या महिलेने तिच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा असताना अज्ञात घरफोड्यांनी घरात प्रवेश करून तेरा लाखांचे सोने आणि रोख तीन लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार गेल्या आठवड्यात पायधुनी पोलिसांत दाखल केली होती.
गुन्हे शाखेच्या कक्ष दोनचे अधिकारी या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तक्रारदार महिलेच्या मुलीच्या चौकशीत तिचे एका मुलाशी प्रेमसंबंध असून घरच्यांच्या विरोधामुळे तिचे प्रियकरासोबतच्या भेटीगाठी आणि बोलणे बंद असल्याचे पोलिसांना आढळले. त्याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजस्थानातील तांत्रिक टोळीचे रॅकेट उघड झाले. प्रियकराशी ताटातूट झाल्याच्या काळात मुलीला इरफान खानजी या इन्स्टाग्राम पेजवर प्रेमभंग झालेल्यांसाठीची पोस्ट दिसली. 'हरवलेले प्रेम चोवीस तासांत परत मिळवा, अर्धवट राहिलेले प्रेम परत मिळवण्याचा उपाय' असा जाहिरातीचा मजकूर त्यावर होता. होते.
मुलीने संपर्कासाठी आपला मोबाईल क्रमांक त्या इन्स्टापेजवर दिला. काही दिवसांनी एका इसमाने तिच्या मोबाईलवर फोन करत आपण मौलवी बोलत असल्याचे सांगितले. प्रेमातील अडथळा दूर करायचा असेल तर तांत्रिक विधी करण्यासाठी चांदीची मटकी, सोन्याचा मासा, खिळे आणि दिवा, हात्तातोडी वनस्पती आदी सामान लागेल, असे सांगून त्याने मनी ट्रान्स्फरद्वारे वारंवार रकमा पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मुलीने त्यांना घरातील तीन लाख १८ हजार रुपये चोरून त्यांना पाठवले. इतर सामानासाठी लागणारे सोने मुलीनेच घरातून चोरले आणि मुंबईत आलेल्या आरोपींना दिले