गिरीश चित्रे / मुंबई
मुंबईतील शिवडी मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा गड मानला जातो. विद्यमान आमदार अजय चौधरी यांना मतदारांनी दोन वेळा पसंती दिली. उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. मात्र २००९ मध्ये विजयी झालेले मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना अजय चौधरी यांच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. २०१४ - १९ च्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी विजयी उमेदवारांना पडलेल्या मतांपैकी काही मतांनीच मनसेच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र गेल्या काही वर्षांत राजकीय समीकरण बदलले असून शिवडीकर मशाल पेटवणार की इंजिन सुसाट निघणार हे २३ नोव्हेंबर रोजी निकालानंतर स्पष्ट होईल.
१५ ऑक्टोबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल अशी निवडणूक प्रक्रिया आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून पक्षाच्या अधिकृत आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मुंबईत ३६ विधानसभा मतदारसंघ असून मुंबई काबीज करण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतून ४२० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघात एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असले तरी खरा सामना शिवसेना विरुद्ध मनसे असा रंगणार आहे.
महायुतीचा मनसेला छुपा पाठिंबा!
शिवडी विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली होती. महायुती असो वा महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार प्रत्येकाने शिवडीत निवडून येण्यासाठी रणनीती आखली आहे. अधिकाधिक उमेदवार निवडून आल्यास सत्तेत अधिक प्रभावीपणे दावा करणे शक्य होणार आहे. मात्र शिवडी विधानसभा मतदारसंघात महायुतीने उमेदवार उभा केला नसल्याने महायुतीचा मनसेला छुपा पाठिंबा आहे, हे स्पष्ट होते.
७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अजय विनायक चौधरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बाळा दगडू नांदगावकर - महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मदन हरिश्चंद्र खळे - बहुजन समाज पार्टी
मिलिंद देवराव कांबळे - वंचित बहुजन आघाडी
मोहन किसन वायदंडे - स्वाभिमानी पक्ष
अनघा कौशल छत्रपती - अपक्ष
संजय (नाना) गजानन आंबोले - अपक्ष
मतदारांची संख्या
पुरुष - १,४६,८३३
महिला - १,२७,४६१
तृतीयपंथी - ५
एकूण - २,७४,२९९