मुंबई

धारावीत पुनर्विकास आणि घराणेशाही हेच प्रमुख मुद्दे, 'लाडकी बहीण' आमदार होणार?

Maharashtra Elections 2024 : धारावी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर गेल्या चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

तेजस वाघमारे

तेजस वाघमारे

मुंबई : धारावी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर गेल्या चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. एससी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. याच मतदारांच्या बळावर आजवर काँग्रेसने मतदारसंघावर वर्चस्व गाजवले आहे. देशात कोणत्याही पक्षाची लाट आली तरी मतदारसंघ काँग्रेससोबतच राहिला आहे. या मतदारसंघाचे गेली वीस वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या वर्षा गायकवाड या खासदार झाल्याने त्यांनी या मतदारसंघातून आपली बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. धारावीतील निवडणूक प्रचारात धारावी पुनर्विकास आणि घराणेशाही हेच प्रमुख मुद्दे राहणार आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीचे नाव घेतले जाते. धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाने गती घेतली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडून पुनर्विकासाला विरोध करण्यात येत आहे. तर महायुतीकडून पुनर्विकासाचे समर्थन करण्यात येत आहे. यातच होऊ घातलेल्या निवडणुकीत पुनर्विकासाचा प्रश्न कळीचा ठरणार आहे. धारावीत सुरू असलेल्या सर्वेक्षणाला शिवसेना उबाठा गट, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पक्षांकडून विरोध होत आहे. मात्र स्थानिक पातळीवर सर्वेचा विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष समोर येत नसल्याचे धारावीतील नागरिक सांगत आहेत. तर विकासाच्या मुद्द्यावर सर्वेसाठी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काही संघटना आग्रही आहेत. त्यामुळे या मतदारसंघात धारावी पुनर्विकासाचा प्रमुख मुद्दा असणार आहे.

१९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धारावी मतदारसंघात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सत्येंद्र मोरे विजयी झाले होते. यानंतरच्या १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रेमानंद आवळे विजयी झाले. त्यानंतरच्या १९८५ आणि १९९० मधील निवडणुकीत काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले. १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे बाबुराव माने यांचा विजय झाला. त्यानंतरच्या १९९९ च्या निवडणुकीत पुन्हा एकनाथ गायकवाड विजयी झाले. एकनाथ गायकवाड खासदार झाल्यानंतर त्यांनी आपली मुलगी वर्षा गायकवाड यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली. तेव्हापासून २००४ ते २०१९ दरम्यान झालेल्या चार निवडणुकांमध्ये वर्षा गायकवाड यांनी विजय संपादन केला आहे.

शिवसेना शिंदे गटाने राजेश खंदारे यांना उमेदवारी दिली आहे. तर २००९ च्या निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार मनोहर रायबागे हे यंदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर लढत आहेत. तर आम आदमी पार्टीचे मुंबई उपाध्यक्ष अलॅड. संदीप कटके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. तर उबाठा गटाचे बाबुराव माने यांनी अर्ज मागे घेतल्याने धारावीत चौरंगी लढत होणार आहे. धारावीत बौद्ध, चर्मकार, उत्तर

भारतीय, दक्षिण भारतीय, मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. यातील मुस्लिम मते निर्णायक ठरणार असून इतर समाजाच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेली चार दशके एकाच कुटुंबाला धारावीचे प्रतिनिधित्व देण्यात येत असल्याने काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल धारावीतील नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे धारावीतील निवडणूक प्रचारात धारावी पुनर्विकास आणि घराणेशाही हेच प्रमुख मुद्दे राहणार आहेत.

मतदारसंघातील समस्या

■ अनेक परिसरात शौचालये नाहीत

■ शौचालये ठेकेदारांच्या घशात, नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे

■ धारावी पुनर्विकासाचा प्रश्न

■ पावसाळ्यात पाणी साचते

■ वाहतूक कोंडी

मतदारसंघातील मतदार

■ पुरुष - १ लाख ४५ हजार ५२५ ■ महिला १ लाख १५ हजार

४४९

■ थर्ड जेंडर - ३८

■ एकूण मतदार २ लाख ६१ हजार १२

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी