मुंबई : महाराष्ट्रात हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना, राज्य सरकारने सुरू केलेला STEMI कार्यक्रम (ST-Elevation Myocardial Infarction) अनेक रुग्णांसाठी जीवनदान ठरत आहे. जानेवारी २०२० मध्ये बंगळुरूस्थित ट्रायकॉन हेल्थच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम हृदयविकाराच्या झटक्याचे वेळीच निदान आणि उपचार यावर केंद्रित असून या कार्यक्रमामुळे आतापर्यंत राज्यभरात १३,२०३ रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
STEMI म्हणजे ST-Elevation Myocardial Infarction, हा हृदयविकाराचा प्रकार आहे, ज्यामध्ये हृदयातील रक्तपुरवठा अचानक बंद होतो आणि त्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही.
हा कार्यक्रम ‘स्पोक अँड हब’ मॉडेलवर आधारित आहे. स्पोक सेंटर्स म्हणजे उपजिल्हा व जिल्हा रुग्णालये, जिथे आपत्कालीन आणि अतिदक्षता सेवा उपलब्ध आहेत.
तर, हब ही मोठी रुग्णालये असतात, जिथे हृदयरोगतज्ज्ञ आणि हृदयशस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत. सध्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांतील १,९०६ प्राथमिक आरोग्य केंद्रे या योजनेचा भाग आहेत.
हृदयविकाराची लक्षणे दिसताच रुग्णाचे ‘स्पोक’ हॉस्पिटलमध्ये ईसीजी करण्यात येते. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सहाय्याने हृदयरोगतज्ज्ञ ईसीजी वाचतात आणि काही मिनिटांतच अहवाल क्लाऊडद्वारे हॉस्पिटलला पाठवला जातो. यामुळे त्वरित हस्तक्षेप शक्य होतो.
STEMI निदान झालेल्या रुग्णाला तात्काळ थ्रॉम्बोलायसिस (रक्ताच्या गाठी विरघळवण्याचा उपचार) दिला जातो आणि ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या हब रुग्णालयात हलवले जाते.
२०२०-२१ मध्ये अवघ्या ३,८०२ ईसीजी चाचण्या होऊन ३० STEMI प्रकरणे नोंदली गेली होती. पुढील २०२१-२२ मध्ये ईसीजी चाचण्या झपाट्याने वाढून १,०५,४७९ झाल्या आणि १,०९० प्रकरणे निदर्शनास आली. २०२२-२३ मध्ये ३,३४,२७७ चाचण्या आणि २,८५२ प्रकरणे नोंदली गेली. २०२३-२४ मध्ये ईसीजी संख्या ३,६६,४४४ इतकी तर STEMI प्रकरणे २,६४२ इतकी होती. २०२४-२५ मध्ये तर विक्रमी १०,१३,२३२ ईसीजी चाचण्या पार पडल्या असून ६,०७७ रुग्णांमध्ये STEMI आढळून आला. एप्रिल २०२५ पर्यंत फक्त एका महिन्यातच १,४७,४९० ईसीजी चाचण्या आणि ६६६ STEMI प्रकरणे नोंदली गेल्याची माहिती मिळते.
शहरी भागात रुग्णसंख्या अधिक
या उपक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ३-४% ग्रामीण आणि ८-१०% शहरी लोकसंख्या हृदयविकाराने ग्रस्त आहे.
स्त्री-पुरुषांचे प्रमाण अधिक
३०-४० वयोगटातील पुरुष आणि ४०-६० वयोगटातील महिलांमध्ये या विकाराचे प्रमाण अधिक आहे. कोरोनरी आर्टरी डिसीज (धमन्यांमध्ये अडथळा) हा STEMI चा मुख्य कारणीभूत प्रकार असून, यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.