मुंबई : गृहनिर्माण प्रकल्पांच्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड प्रकल्पाचा जाहिरातीतील संपर्क क्रमांक आणि पत्ता यात ज्याचा फॉन्ट मोठा असेल त्या फॉन्टमध्ये छापणे महारेराने बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे महारेराचा सर्व तपशील जाहिरातीच्या वरील भागात उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे निर्देश महारेराने जारी केले आहेत. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर ५० हजारांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे.
महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळ, क्यूआर कोड ठळकपणे छापणे यापूर्वीच अनिवार्य केले आहे.
विकासकांनी सहकार्य करावे
विकासक आपल्या गृहनिर्माण प्रकल्पांत जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी, यासाठी वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे, इन्स्टाग्राम, ट्विटर, लिफलेटस, पोस्टर्स, व्हॉट्सअप तत्सम समाज माध्यमे आणि विविध माध्यमांमार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांची जाहिराती करत असतात. या जाहिरातींमध्ये महारेरा क्रमांक, महारेरा संकेतस्थळ, क्यूआर कोड विहित आकारात छापणे बंधनकारक आहे. ग्राहकांसाठी असलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीत विकासकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महारेराने केले आहे.