मुंबई : महारेराने आतापर्यंत घर खरेदीदारांच्या नुकसानभरपाईचे तब्बल २६८.८७ कोटी रुपये संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने वसुल केले आहेत. तर या वर्षी ७० कोटींची नुकसानभरपाई वसूल केली आहे. मुंबई उपनगराने ३५२ कोटी रुपयांपैकी ११२ कोटी रुपये आणि मुंबई शहराने १०४ कोटींपैकी ५३ कोटी रुपये वसूल करून दिले आहेत.
महारेराची मे २०१७ साली स्थापना झाल्यापासून महारेराने आतापर्यंत १२९१ तक्रारदारांच्या नुकसानभरपाईपोटी ७९२ कोटी रुपयांचे वसुली आदेश जारी केलेले आहेत. यापैकी १०३ कोटी रुपयांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण समोर प्रलंबित असल्याने या प्रकरणी वसुलीवर बंधने आहेत. शिवाय महारेरासारख्या अर्धन्यायिक यंत्रणेला फक्त प्रकरणपरत्वे वसुलीचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. प्रत्यक्षात या आदेशांची अन्मलंबजावणी करण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला आहेत. दिलेल्या मुदतीत विकासकांनी नुकसान भरपाई दिली नाही तर ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका अत्यंत महत्वाची असते. यासाठी स्थावर संपदा (नियमन आणि विकास)अधिनियम २०१६ च्या कलम ४०(१) अन्वये सदर वसुली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदिनुसार जमीन महसुलाची थकबाकी वसूल करण्याचे अधिकार फक्त जिल्हाधिकारी कार्यालयांना असतात. म्हणून महारेराकडून असे वॉरंट्स संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वसुलीसाठी पाठविले जातात.
आतापर्यंत महारेराने विविध जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मदतीने वसूल केलेल्या २७० कोटी रूपयांत मुंबई उपनगराने ३५२ कोटी रुपयांपैकी ११२ कोटी रुपये, मुंबई शहराने १०४ कोटींपैकी ५३ कोटी रुपये, पुण्याने १९६ कोटी रुपयापैकी ४७ कोटी रुपये, ठाणे शहराने ७४ कोटींपैकी २३ कोटी रुपये , अलिबाग २४ कोटींपैकी ९.५ कोटी रुपये वसूल केलेले आहेत. याशिवाय नाशिक ४.९० कोटी, सिंधुदुर्ग ७२ लाख , सोलापूर १२ लाख , चंद्रपूर ९ लाख रुपये वसूल करून या जिल्ह्यातील नुकसान भरपाई निरंक झालेली आहे.
जिल्हानिहाय वॉरंट्स आणि वसुलीचा तपशील
मुंबई शहर : २७ प्रकल्पांतील ४७ वारंट्सपोटी १०४ कोटी रुपये देयांपैकी १८ प्रकल्पांतील २८ वारंट्सपोटी ५३ कोटी रुपये वसूल
मुंबई उपनगर : १३५ प्रकल्पांतील ४८२ वारंट्सपोटी ३५२ कोटी रुपये देय. यापैकी ६६ प्रकल्पांतील १३४ वारंट्सपोटी ११२ कोटी रुपये वसूल
पुणे : १३९ प्रकल्पांतील २७४ वारंट्सपोटी १९५ कोटी रुपये देय. यापैकी ४४ प्रकल्पांतील ७१ वारंट्सपोटी ४७ कोटी रुपये वसूल
ठाणे : ८९ प्रकल्पांतील २३७ वारंट्सपोटी ७४.६३ कोटी रुपये देय. यापैकी २५ प्रकल्पांतील ४८ वारंट्सपोटी २३ कोटी वसूल
अलिबाग/रायगड : ४७ प्रकल्पांतील ११९ वारंट्सपोटी २४ कोटी रुपये देय. यापैकी २२ प्रकल्पांतील ६३ वारंट्सपोटी ९ कोटी वसूल
पालघर : ३३ प्रकल्पांतील ८६ वारंट्सपोटी २०.४९ कोटी रुपये देय. यापैकी ६ प्रकल्पांतील ९ वारंट्सपोटी ४.५९ कोटी रुपये वसूल.
नागपूर : ६ प्रकल्पांतील १८ वारंट्सपोटी १०.६३ कोटी रुपये देय. पैकी २ प्रकल्पांतील १३ वारंट्सपोटी ९.६५ कोटी रुपये वसूल.
संभाजीनगर : २ प्रकल्पांतील १३ वारंट्सपोटी ४.०४ कोटी रुपये देय. पैकी २ प्रकल्पांतील ९ वारंट्सपोटी ३.८४ कोटी वसूल.
नाशिक : ५ प्रकल्पांतील ६ वारंट्सपोटी ३.८५ कोटी देय. पैकी ४ प्रकल्पांतील ६ वारंट्सपोटी ४.९० कोटी रुपये वसूल.
याशिवाय सिंधुदुर्ग मध्ये २ प्रकल्पांत ७२ लाख, सोलापूर मध्ये एका तक्रारीसाठी १२ लाख आणि चंद्रपूरचे एका तक्रारीचे ९ लाख वसूल झालेले आहेत.