एफपीजे न्यूज सर्व्हिस/मुंबई
प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या बहुप्रतीक्षित 'दिवाळी पहाट' या वार्षिक संगीतमयी मैफिलीचा आनंद घेण्यासाठी रविवारी सकाळी शीव येथील श्री षण्मुखानंद हॉलमध्ये शेकडो संगीतप्रेमींनी मोठी गर्दी केली. दिवाळीच्या सणात संगीताची सुरेल उधळण करणारी ही मैफील आता मुंबईकरांसाठी एक सांस्कृतिक परंपरा बनली आहे.
या विशेष मैफिलीसाठी दरवर्षी सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईत येणाऱ्या महेश काळे यांनी उपस्थित रसिकांना अभिवादन करताना भावना व्यक्त केल्या, 'मला भारताच्या लक्ष्मीच्या राजधानीत (मुंबईत) लक्ष्मीपूजन करायला मिळत आहे, याचा आनंद आहे.' महेश काळे यांनी मैफिलीची सुरुवात 'राग अहिर भैरव'ने करत संपूर्ण वातावरणात भावपूर्ण सूर भरले.
त्यानंतर त्यांनी 'अलबेला सजन आयो रे' आणि 'दीपावली दिन मनाओ' या रचना सादर केल्या. प्रेक्षकांनाही गाण्यात सहभागी करून घेत त्यांनी 'माझे जीवन गाणे', 'हे सुरांनो चंद्र व्हा' आणि 'विठ्ठला विठ्ठला' यांसारख्या अत्यंत लोकप्रिय मराठी बंदिशी व अभंग सादर केले. त्यापाठोपाठ त्यांनी 'खरा तो एकचि धर्म' हे गीत गाऊन प्रेक्षकांची दाद मिळवली.
कार्यक्रमाला बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची विशेष उपस्थिती लाभली होती. महेश काळे यांच्या गायकीचे कौतुक करताना पंडितजी म्हणाले, 'मी इतकं सुंदर गाणारा कलाकार या आधी कधीही ऐकला नाही... ते मनापासून, आत्म्यापासून गातात. त्यांची गाणी खरोखरच खूप अप्रतिम आहेत!' यावेळी महेश काळे यांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यतिथी झालेले आपले गुरू स्वर्गीय पंडित जितेंद्र अभिषेकी यांना आदरांजली वाहिली. आपल्या गुरूंच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी 'अनंता तुला कोण पाहू शके' ही रचना त्यांना समर्पित केली.