मुंबई : माहुल परिसरात पेट्रोलियम कंपन्या, रिफायनरी असून सुमारे ७५ हजार लोकसंख्या आहे. या परिसरात आता तीन मजली अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारले जाणार आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवासस्थान बांधले जाणार असून आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी मुंबई महापालिका १८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
मुंबईत आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी अग्निशमन दलाची मदत जलदगतीने पोहोचावी, यासाठी मुंबई पालिकेच्या अग्निशमन दलाकडून केंद्रांची संख्या आणि सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्या आणि रिफायनरींच्या परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या माहुल-अणिक गाव परिसरात अत्याधुनिक अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
पालिकेच्या सीटीएस क्रमांक २१३-सी, माहुलजवळील अणिक गाव येथे हे अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित केंद्र तीन मजली असून येथे अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासव्यवस्थाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रशिक्षण आणि सरावासाठी आरसीसी ड्रिल टॉवर, तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी आवश्यक असलेले डिझेल गोदाम उभारण्यात येणार आहे.
माहुल परिसरात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलियम कंपन्या, औद्योगिक आस्थापना आणि रिफायनरी असल्याने या भागात आगीसह विविध प्रकारच्या आपत्कालीन घटनांचा धोका कायम असतो.
अशा परिस्थितीत सध्या असलेल्या अग्निशमन केंद्रांवर अवलंबून राहण्याऐवजी माहुल-अणिक गाव परिसरातच स्वतंत्र अत्याधुनिक केंद्र उपलब्ध झाल्याने बचाव आणि अग्निशमन कार्याला मोठी गती मिळणार आहे.
नवीन केंद्रामुळे माहुल, अणिक गाव परिसरातील रहिवासी वस्त्या तसेच औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये आग किंवा अन्य आपत्ती उद्भवल्यास अग्निशमन दलाला कमी वेळेत घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू करणे शक्य होणार आहे. विशेषतः पेट्रोलियम कंपन्या आणि रिफायनरी परिसरातील संभाव्य मोठ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे.