मुंबई

Mumbai : निसर्ग उन्नत मार्ग महागला; ७५० रुपयांत मासिक पास योजना, विदेशी पर्यटकांसाठी ३ हजार फी

मलबार हिल येथे देशातील पहिला निसर्ग उन्नत मार्ग साकारण्यात आला आहे. कमला नेहरू उद्यान ते फिरोजशहा मेहता उद्यान अशा या उन्नत मार्गाचे वर्षभरापूर्वी लोकार्पण झाले, त्याला मुंबईकर आणि विदेशी पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत गेला.

Swapnil S

मुंबई : मलबार हिल येथे देशातील पहिला निसर्ग उन्नत मार्ग साकारण्यात आला आहे. कमला नेहरू उद्यान ते फिरोजशहा मेहता उद्यान अशा या उन्नत मार्गाचे वर्षभरापूर्वी लोकार्पण झाले, त्याला मुंबईकर आणि विदेशी पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत गेला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून उन्नत मार्गाची सैर करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या घसरत आहे. मुंबईकर पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी ७५० रुपयांत मासिक पास योजना सुरू करण्यात आली आहे. तर विदेशी पर्यटकांसाठी मासिक पास ३ हजार रुपयांत मिळणार आहे.

दरम्यान, मलबार हिल परिसरात जे नागरिक राहतात त्यांना मासिक पास योजनेमुळे रोज मॉनिॅग वॉकसाठी येणे शक्य होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मलबार हिल येथील देशातील पहिल्या निसर्ग उन्नत मार्गाचे (एलिव्हेटेड नेचर ट्रेल) ३० मार्च २०२५ मध्ये लोकार्पण झाल्यानंतर या मार्गावरून निसर्गाची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची अक्षरश: गर्दी होत असे. मात्र निसर्ग उन्नत मार्गाची क्रेझ गेल्या काही दिवसापासून कमी झाली आहे. शनिवार, रविवारचे स्लॉट तर आठवडाभर आधीच हाऊसफुल होत असत. त्यामुळे पर्यटकांनी सोमवार ते शुक्रवार उन्नत मार्गाच्या सफरीची वेळ निवडावी लागत होती. मात्र आता शनिवार, रविवारीही स्लॉट रिकामी असतात. त्यामुळे पालिकेने मलबार हिल व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मॉर्निंग व अथवा सायंकाळी निसर्ग मार्गावरून फेरफटका मारता यावा, यासाठी मासिक पास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत परदेशी पर्यटकांचाही विचार करण्यात आला असून त्यांच्यासाठी मासिक ३ हजार रुपये आकारण्यात येणार आहेत.

या योजनेंतर्गत मासिक पासधारकांना दिवसातून एकदाच कोणत्याही स्लॉट निवडावा लागणार आहे. पहाटे ५ ते रात्री ५ वाजेपर्यंत दिवसभरात एक तासासाठी फेरफटका मारता येणार आहे. दिवसभरात १६ स्लॉट असून दिवसभरात केवळ ३ हजार २०० पर्यटक या मार्गावरून फेरफटका मारू शकतात.

सिंगापूरच्या धर्तीवर तेथील ‘ट्री टॉप वॉक’ या संकल्पनेशी साधर्म्य असलेला हा मार्ग वर्षभरापूर्वी मुंबईत विकसित करण्यात आला आहे. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता हा मार्ग उभारण्यात आला आहे. मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या तसेच १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी आणि सरपटणारे प्राणी पाहण्याची संधी या मार्गावर नागरिकांना मिळत आहे. रात्रीच्या वेळी आकर्षक रोषणाई, गर्द हिरवेगार वृक्ष, लाकडी पूल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मार्गावर एका ठिकाणी समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी ’सी व्हिविंग डेक’ देखील बांधण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत लाकडी फलाटाच्या उन्नत मार्गावर चालण्याची संधी नागरिकांना मिळत आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी सांधे अशा पद्धतीची रचना या मार्गावर करण्यात आली आहे.

३० मार्चला होणार एक वर्ष

मलबार हिल येथील देशातील पहिल्या निसर्ग उन्नत मार्गाचे ३० मार्च २०२५ मध्ये लोकार्पण झाले. त्यामुळे या उन्नत मार्गाला एक वर्ष होणार आहे. आतापर्यंत सुमारे ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी या उन्नत मार्गावर फेरफटका मारल्याचे सांगण्यात येत आहे.

वैशिष्ट्ये

  • सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत हा उन्नत मार्ग पर्यटकांसाठी खुला.

  • मलबार हिल येथील निसर्ग उन्नत मार्गाला भेट देण्यासाठी naturetrail.mcgm.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन Book Now वर क्लिक करा.

  • भारतीय नागरिकांसाठी २५ रुपये तर परदेशी नागरिकांना १०० रुपये प्रवेश शुल्क

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन