मालाड परिसरातील इंटरफेस हाइट्स सोसायटी कॉम्प्लेक्समधील अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या ७ वर्षांच्या मुलाला महिलेने कारने चिरडले. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली. हा संपूर्ण प्रसंग CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलाचे नाव अन्वय मजुमदार (वय ७) असून तो आपल्या मित्रासोबत सोसायटीच्या आवारात खेळत होता. या वेळेस काळ्या रंगाची टोयोटा हायराइडर (एमएकह ४७ बी टी ३०७०) कारने त्याला चिरडले. या प्रकरणी महिला वाहनचालक श्वेता शेट्टी-राठोडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहा व्हिडिओ -
पायावर शस्त्रक्रिया
अन्वयच्या डाव्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले. त्याला तातडीने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
सुडभावनेतून घडली घटना?
अन्वयची आई महुआ मजुमदार यांनी २० ऑक्टोबर रोजी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने आरोपीवर गंभीर आरोप करत म्हटले की, आरोपी सोसायटीच्या सेक्रेटरीची पत्नी असून तिने निष्काळजीपणे गाडी चालवली. महुआच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या कौटुंबिक वादातून सूडाच्या भावनेने हा अपघात घडवला गेला असावा असा संशय आहे. महुआने असेही नमूद केले की, घटनेनंतर आरोपीने वैद्यकीय खर्च उचलण्याची ऑफर दिली होती, परंतु मुलाच्या तब्येतीसाठी तिने एकदाही संपर्क साधलेला नाही.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. ही घटना बेजबाबदारपणामुळे घडली की सूडाच्या भावनेने, याचा तपास पोलिस करत आहेत.