मुंबई : तीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका मिळविण्यासाठी कागदपत्रात फेरफार करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेले माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठाने त्यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला, मात्र शिक्षेला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला. त्यामुळे त्यांची तुरुंगवारी तूर्तास टळली असली तरी त्यांच्या आमदारकीवरची टांगती तलवार कायम आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते ॲड. माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. या अपिलावर न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या एकलपीठासमोर तातडीने सुनावणी झाली. यावेळी कोकाटे यांच्या वतीने बाजू मांडत ॲड. अनिकेत निकम यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी विनंती केली. खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला, मात्र अपील दाखल करून घेताना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
आर्थिक परिस्थिती बदलत असते!
ॲड. रवींद्र कदम यांनी माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडताना सांगितले की, घर मिळाल्याची तारीख आणि घर घेतल्यानंतरची आर्थिक परिस्थिती बदलत असते. यावर पीडब्ल्यूडीने याबाबत काय ‘क्रॉस एक्झॅमिनेशन’ केले आहे तेही बघून घ्या, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. तसेच ॲड. कदम यांनी कोकाटे यांची आर्थिक परिस्थिती कशी बदलली आहे याचे जुने आणि नवे संदर्भ यावेळी मांडले.
प्रकरण काय?
कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात दिल्या जाणाऱ्या सदनिकेचा लाभ कोकाटे यांनी घेतला. ही सदनिका घेताना आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे सादर करावी लागतात. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात ‘निर्माण अपार्टमेंट’मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका घेतल्या होत्या.
कोकाटेंचा राजीनामा मंजूर
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना गुरुवारी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारत तो मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर केला होता. अखेर शुक्रवारी कोकाटे यांचा राजीनामा मंजूर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच कोकाटे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
कोकाटेंना बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला
लीलावती रुग्णालयाकडून सांगण्यात आले की, माणिकराव कोकाटे हे परवा रुग्णालयात दाखल झाले, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले व औषधोपचार सुरू करण्यात आले. कोकाटे यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात चार व्हेसल्समध्ये चार ब्लॉक्स आढळल्याने त्यांना बायपास शस्त्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला देण्यात आला आहे. लीलावतीची काही इंटेग्रिटी असते आणि आम्ही ती प्रामाणिकपणे जपतो. आम्ही रुग्णाला असेच दाखल करत नाही, गरजेचे असते म्हणून दाखल करतो. त्यांना बायपास सर्जरी करावी लागणार आहे हे स्पष्ट झाले आहे.