मुंबई

माथेरानच्या मिनी ट्रेनचा मेकओव्हर; वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत होणार

माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनचा मेकओव्हर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनचा मेकओव्हर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार नेरळ-माथेरान टॉय ट्रेनच्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे रूप देण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावर पर्वतीय रेल्वेच्या वैभवशाली प्रवासाचा अनुभव पुन्हा जिवंत होणार आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत एक विशेष टीम ही स्टीम इंजिन हूडचे मॉडेल अहोरात्र मेहनत करून तयार करत आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील बहुतांश नागरिकांचे माथेरान हे सर्वात आवडते ठिकाण आहे. मध्य रेल्वेद्वारे नॅरो गेज मार्गावर चालविण्यात येणाऱ्या टॉय ट्रेन सेवेला पर्यटक पसंती देतात. नेरळ ते माथेरानपर्यंतच्या उंच पर्वतरांगा पाहणे हे प्रत्येक पर्यटकाचे स्वप्न असते. भारतातील काही ऐतिहासिक पर्वतीय रेल्वेपैकी एक असलेल्या नेरळ-माथेरान लाइट रेल्वेने १९०७ मध्ये स्टीम इंजिनद्वारे चालवलेल्या पहिल्या टॉय ट्रेनने ११६ वर्षे पूर्ण केली आहेत.

आता नेरळ-माथेरान भागावर सध्याच्या डिझेलवर चालणाऱ्या इंजिनला ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा लूक देऊन या नॅरो गेज रेल्वेच्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मध्य रेल्वे सज्ज झाली आहे. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेतील अभियंते आणि तंत्रज्ञांची एक विशेष टीम सदर बदल करण्यासाठी, स्टीम इंजिन हूडचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि आवश्यक बदल करण्यासाठी चोवीस तास काम करत आहे. हेरिटेज लूक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक प्रक्रियांचा समावेश होता. ज्यामध्ये सध्याच्या इंजिनचे हुड काढून टाकणे, नवीन ऐतिहासिक वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे उत्पादन आणि फिटिंग, सध्याच्या डिझेल इंजिनमध्ये बदल करणे, वाफेचे फिटिंग आणि ध्वनी उत्पादन प्रणाली आणि शेवटी नवीन ऐतिहासिक हुडसह इंजिनचे पेंटिंग आणि आवश्यकतेनुसार स्टिकर्ससह सजावट करणे, अशी कामे करण्यात येत आहे.

अनेक पायाभूत सुविधांची कामे सुरू

मध्य रेल्वेने प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी येथे अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत आणि मोबाईल चार्जिंग सुविधा, लॉकर यांसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज, जास्तीत जास्त आराम आणि गोपनीयता देण्यासाठी डिझाइन केलेले, पर्यटकांसाठी स्लीपिंग पॉड्स सादर करण्यासाठी सज्ज आहे. रूम सर्व्हिसेस, फायर अलार्म, इंटरकॉम सिस्टम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम सुविधा, अशा इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हा उपक्रम पर्यटनाला चालना देऊन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारा ठरणार आहे.

ऐतिहासिक ट्रेनमधून विलोभनीय अनुभव

नेरळ-माथेरान राइड आता ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा, निसर्ग जवळून पाहण्याचा आणि माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत रममाण होण्याचा विलोभनीय अनुभव देईल.

अमन लॉज ते माथेरान शटल सेवा पावसाळ्यातही

नेरळ-माथेरान रेल्वेचे बांधकाम १९०४ मध्ये सुरू झाले आणि दोन फूट गेज लाईन अखेरीस १९०७ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून, पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो, तथापि, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातही सुरू असते.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश