मुंबई : मेट्रो मार्गिका ९ सुरू झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मीरा-भाईंदर कॉरिडोअरमधील उपनगरीय प्रवासी संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. यंदाच्या ८ एप्रिल रोजी या मेट्रो मार्गिकेची सेवा सुरू झाल्यापासून मीरा रोड स्थानकावरील सरासरी दैनंदिन प्रवाशांची संख्या सुमारे १० टक्क्यांनी, तर भाईंदर स्थानकावरील संख्या तब्बल १६ टक्क्यांनी घटली आहे. उपनगरीय लोकल गाड्यांमधील गर्दीला कंटाळलेला एक मोठा प्रवासी वर्ग आता मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पश्चिम रेल्वेच्या जाळ्यातील मीरा रोड आणि भाईंदर ही अत्यंत महत्त्वाची व वर्दळीची स्थानके असल्याने रेल्वे अधिकारी आणि वाहतूक नियोजक या बदलावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईच्या वेगाने वाढणाऱ्या उत्तर उपनगरांमध्ये मेट्रो मार्गिका ९ मुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काळात या मेट्रो मार्गिकेमुळे लोकल गाड्यांवरील ताण कमालीचा कमी होईल आणि उपनगरातील प्रवासाचे चित्र बदलेल, असा विश्वास वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मेट्रो लाइन ९ हा दहिसर पूर्व स्टेशन ते मीरा-भाईंदर यांना जोडणारा मेट्रो लाईन ७चा पुढचा टप्पा आहे. सध्या सुमारे चौदा किलोमीटरपैकी दहिसर पूर्व ते काशीगाव हा पाच किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून पांडुरंगवाडी, मिरा गाव व काशीगाव अशी स्टेशन्स त्यांवर आहेत. तेथे वाहतूक सुरू झाली असून त्यामुळे मिरा रोड व दहिसर चेक नाका परिसरात राहणाऱ्यांना लोकलचा प्रवास टाळून बोरीवली ते अंधेरी या टप्प्यात कोठेही जाणे शक्य झाले आहे. अनेक जण मेट्रोने अंधेरीपर्यत जाऊन नंतर लोकलने जाणेही पसंत करत आहेत. या मार्गावरील पुढचा भाईंदरपर्यंतचा टप्पा या वर्षभरात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
१० ते १६ टक्के घट
उपलब्ध प्रवासी आकडेवारीनुसार, मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वी ७ मार्च ते ७ एप्रिल या काळात मीरा रोड स्थानकावरून ४०.४२ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. मात्र, मेट्रो धावू लागल्यानंतर ८ एप्रिल ते १ मे या कालावधीत हा आकडा २८.१६ लाखांवर घसरला आहे. अशीच परिस्थिती भाईंदर स्थानकावरही पाहायला मिळाली असून, येथील प्रवासी संख्या १४७.७६ लाखांवरून ९५.७० लाखांवर आली आहे. तौलनिक कालावधी कमी असला, तरी दैनंदिन सरासरीच्या हिशोबाने ही घट रेल्वे प्रशासनासाठी अत्यंत लक्षणीय मानली जात आहे.