महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या २,६४० सदनिकांच्या संगणकीकृत सोडतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सोडतीसाठी एकूण ७५,३६६ अर्ज प्राप्त झाले असून प्रति सदनिकेमागे सरासरी २८.५४ अर्ज प्राप्त झाले आहेत.
मुंबई मंडळाकडून संगणकीकृत सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमधील महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ जाहीर करण्यात येणार आहे.
सध्या आदर्श आचारसंहिता २५ जून २०२६ पर्यंत लागू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीची घोषणा झाल्यापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहते. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच सोडतीची तारीख जाहीर केली जाईल.
अर्ज प्रक्रियेला मोठा प्रतिसाद
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ तसेच मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत विविध वसाहतींतील एकूण २,६४० सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३(५) आणि ३३(७) अंतर्गत विकासकांकडून प्राप्त झालेल्या सदनिका तसेच विपणन विभागातील प्रतीक्षा यादीची मुदत संपलेली रिक्त घरे यांचा समावेश आहे.
या संदर्भातील जाहिरात ३० मार्च २०२६ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ मे २०२६ निश्चित करण्यात आली होती. कमी करण्यात आलेली विक्री किंमत, काही योजनांमधील उपलब्ध सुविधा, पार्किंगची व्यवस्था, दर्जेदार बांधकाम, प्रमुख ठिकाणांवरील प्रकल्प आणि बाजारभावापेक्षा कमी किंमती यांसारख्या कारणांमुळे या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे म्हटले जात आहे.
पात्र अर्जदारांची यादी जाहीर होणार
पात्र अर्जदारांची प्राथमिक यादी १० जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
अर्जदारांना १२ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत ऑनलाइन दावे आणि हरकती नोंदवता येतील.
प्राप्त दावे आणि हरकतींची छाननी झाल्यानंतर अंतिम पात्र अर्जदारांची यादी १६ जून २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
मुंबईतील विविध भागांमध्ये उपलब्ध सदनिका
३० मार्च २०२६ रोजी मुंबई मंडळाने विविध उत्पन्न गटांसाठी २,६४० सदनिकांच्या संगणकीकृत सोडतीची घोषणा केली होती. या सदनिका कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्रा चाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाष नगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा येथील गृहनिर्माण योजनांमध्ये उपलब्ध आहेत.
या सोडतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १४५ सदनिका, निम्न उत्पन्न गटासाठी (LIG) ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) ७९८ सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) ८३९ सदनिका उपलब्ध आहेत.
विक्रोळीतील सदनिकांच्या किंमतीत ७.५ टक्के कपात
नागरिकांच्या सोयीसाठी विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगरमधील योजना क्रमांक ५३८ आणि ५३९ अंतर्गत बांधकामाधीन १,२२१ सदनिकांच्या विक्री किंमतीत ७.५ टक्के कपात करण्यात आली आहे.
या १,२२१ सदनिकांपैकी ६१० सदनिका नव्याने जाहीर करण्यात आलेल्या योजना क्रमांक ५३८-अ आणि ५३९-अ अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.