मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे २ हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात मंगळवारी (ता.६) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या लॉटरीमध्ये गोरेगाव, पवई, विक्रोळी आणि दक्षिण मुंबईतील विखुरलेल्या गाळ्यांचा समावेश आहे. या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजार रुपये करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत लवकरच २ हजार घरांची लॉटरी काढण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी नुकतीच केली होती. त्यानुसार मंडळातील अधिकाऱ्यांनी लॉटरीची तयारी सुरू केली आहे. लॉटरीबाबत आज झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी मंगळवारी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंडळातील अधिकारी कामाला लागले असून शनिवार, रविवारी लॉटरीचे काम करण्यासाठी ऑफिस खुले ठेवण्यात येणार आहे.
मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये गोरेगाव, पवई, विक्रोळी आणि दक्षिण मुंबईतील विखुरलेल्या घरांचा समावेश आहे. यामधील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती पुन्हा कमी करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेतील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजार रुपये करण्यात आली आहे.