मुंबई : बृहन्मुंबईतील ५८ बंद/आजारी गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यात येत आहे. ‘म्हाडा’तर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हाडातर्फे गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी १४ सप्टेंबर, २०२३ पासून राबविण्यात येत असलेल्या या विशेष अभियानांतर्गत अद्यापी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने एकूण ०१,०८,४९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८९,६४८ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र/अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन गिरणी कामगारांच्या हक्काच्या घराविषयी अत्यंत संवेदनशील असून त्यांना हक्काचे घर मिळवून देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. म्हणूनच या अभियानाचा लाभ अधिकाधिक गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना घेता यावा याकरिता सदरील मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी गुरुवारी दिली.
येथे संपर्क साधा!
यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या ०१,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावी. सदर प्रक्रियेदरम्यान काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनासाठी ९७१११९४१९१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.