Mira-Bhayandar : पोलिसांच्या कार्यक्रमात गुजराती सूत्रसंचालन; मराठीत बोलण्याची मागणी 
मुंबई

Mira-Bhayandar : पोलिसांच्या कार्यक्रमात गुजराती सूत्रसंचालन; मराठीत बोलण्याची मागणी

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात ‘ऑपरेशन निर्मूलन’ उपक्रमाची अंतिम फेरी पार पडली.

Swapnil S

भाईंंदर : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ अंतर्गत भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात ‘ऑपरेशन निर्मूलन’ उपक्रमाची अंतिम फेरी पार पडली. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविरोधात तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पथनाट्य, चित्रकला, रांगोळी आणि नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान महापौर डिंपल मेहता यांच्या स्वागतावेळी गुजराती भाषेत सूत्रसंचालन करण्यात आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील शासकीय कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त संजय शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर डिंपल मेहता कार्यक्रमस्थळी आल्यानंतर सूत्रसंचालिकेने गुजराती भाषेत त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत सूत्रसंचालन मराठीत करण्याची मागणी केली. भाषेच्या मुद्द्यावरून काही काळ कार्यक्रमस्थळी वातावरण तापले. त्यानंतर सूत्रसंचालन करताना मराठी भाषेचा वापर करण्यास सांगण्यात आले. मात्र, महापौरांचे पोलिसांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत असतानाही पुन्हा गुजराती भाषेचा वापर झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य द्या!

महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असून शासकीय व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे, अशी भूमिका मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मांडली. पोलिसांच्या शासकीय कार्यक्रमातच मराठी भाषेला दुय्यम स्थान मिळणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी गुजराती भाषेतील सूत्रसंचालनाला विरोध केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका; मुंबईत आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आंदोलनाला मनाई, फक्त १ दिवसाची परवानगी

नौदलाची पाणबुडी बचाव क्षमता आणखी वाढणार; भारतीय नौदलात ‘निपुण’ युद्धनौका ३१ ऑगस्टला होणार दाखल

टिटवाळा स्थानकात १५ रात्रींचा पॉवर ब्लॉक; प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी लोकल प्रवाशांचे हाल

उत्तर प्रदेश, बिहार निवडणुकांवर डोळा ठेवून आंदोलन - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राम मंदिर देणगी घोटाळ्याच्या CBI चौकशीची मागणी; सरकारने बैठक रोखली, संत-महंत संतप्त