भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक तोंडावर असताना महायुतीच्या एकसंघतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता महायुतीनेच निवडणूक लढवण्याची भाषा करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. 'मी एका पायावर युती करायला तयार आहे; पण मंत्री सरनाईक यांनाच युती करायची नाही,' असा थेट आरोप आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.
आमदार मेहता यांनी युतीसाठी जागावाटपाचा स्पष्ट फॉर्म्युलाही जाहीर केला असून, ९५ जागांच्या महापालिकेत भाजप ६५, शिंदेसेना १७ आणि उरलेल्या १३ जागा दोन्ही पक्षांनी वाटून घ्याव्यात, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मीरा-भाईंदर महापालिका पूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश व बिहारमधील नागरिकांची लक्षणीय संख्या असलेल्या या शहरात २०१४ नंतर ‘मोदीपर्वा’मुळे भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचाच परिणाम म्हणून २०१७ च्या निवडणुकीत चार-सदस्यीय पॅनल पद्धतीचा फायदा घेत भाजपचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून आले आणि भाजपाने एकहाती सत्ता स्थापन केली. त्यावेळी शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर राजकीय उलथापालथीमध्ये शिवसेनेचे ४ आणि काँग्रेसचे ३ नगरसेवक भाजपात गेले. भाजपातील २ नगरसेवक शिंदेसेनेत गेले असून, माजी आमदार गीता जैन अजून कोणत्याही पक्षात गेलेल्या नसल्याने त्या भाजपच्याच आहेत, असा दावा मेहता यांनी केला.
‘एका सेकंदात युती जाहीर होऊ शकते, पण...’
आमचे ६५, तुमचे १७ उरलेल्या १३ जागा वाटून घेतल्या की एका सेकंदात युती जाहीर होईल आणि पत्रकार परिषद घेता येईल, असे म्हणत मेहता यांनी मंत्री सरनाईकांवर टीकेची झोड उठवली. सरनाईक फक्त लोकांना दाखवण्यासाठी महायुतीची भाषा करत आहेत. १७ जागांवर लढावे लागेल हे लक्षात आल्यामुळे ते युती करणार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीबाबत स्वतः फोन करून विचारणा केल्याचे सांगत मेहता म्हणाले, मी त्यांनाही व्यावहारिक भूमिका सांगितली. तुमच्याकडे जितके नगरसेवक आहेत तितक्याच जागा तुम्ही लढवा, आमच्याकडे जितके आहेत तितक्या आम्ही. शिंदे साहेबांनीही ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे’ असे सांगितले.
युतीसंदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील
दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी युतीबाबत सावध भूमिका घेत सांगितले की, मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीतील युतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल.