Mira-Bhayandar : कृत्रिम तलावातील मूर्ती खाडीत टाकल्याने संताप (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावातील मूर्ती खाडीत टाकल्याने संताप

गणेशमूर्ती विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने घोडबंदर गाव येथील रेतीबंदर खाडीकिनारी तयार केलेल्या कृत्रिम तलावातील पीओपीच्या मूर्ती थेट खाडीत टाकल्याचा व्हिडीओ समोर आल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे.

Swapnil S

भाईंंदर : गणेशमूर्ती विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने घोडबंदर गाव येथील रेतीबंदर खाडीकिनारी तयार केलेल्या कृत्रिम तलावातील पीओपीच्या मूर्ती थेट खाडीत टाकल्याचा व्हिडीओ समोर आल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी विविध संस्था आणि नागरिकांनी केली आहे.

महापालिकेने घोडबंदर गावातील खाडीकिनारी कृत्रिम तलाव तयार केला आहे. ही जागा महापालिकेच्या मालकीची नसून सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने आवश्यक परवानग्यांशिवाय येथे खोदकाम करून तलाव तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या पीओपी व अन्य मूर्ती महापालिकेचे कंत्राटी सफाई कर्मचारी उचलून थेट खाडीत टाकत असल्याचा व्हिडीओ एका नागरिकाने चित्रित केला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

जलप्रदूषण रोखण्यासाठी पीओपीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यास निर्बंध असताना, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच मूर्ती खाडीत टाकल्या जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी संस्थांनी केला आहे.

कायदेशीर कारवाईची मागणी

सत्यकाम फाऊंडेशनचे अॅड. कृष्णा गुप्ता, मनसेचे सचिन पोपळे, गो ग्रीन फाऊंडेशनचे वीरभद्र कोणापुरे यांच्यासह विविध संस्था व नागरिकांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी खाडीत मूर्ती टाकणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात काशिगाव पोलीस ठाण्यात तक्रार करून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून, आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

FSSAI ची नेस्ले इंडियावर कायदेशीर कारवाई; नियमांचे पूर्ण पालन केल्याचा कंपनीचा दावा

NEET Paper Leak : सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश NTA ची पाहणी करणार

राज्यातील प्रवासी व मालवाहतुकीला मिळणार वेग; दोन रेल्वे प्रकल्पांसाठी ९९० कोटी

१०६ पदकांचा विक्रम मोडण्याचे यंदा आव्हान; आशियाई क्रीडा स्पर्धेला आजपासून शानदार प्रारंभ, भारताचे तब्बल ४९६ खेळाडूंचे पथक होणार सहभागी

मुंबईत साथीच्या आजारांचा ताप; तीन महिन्यांत मलेरियाचे ५,९८४ तर डेंग्यूच्या २,१६१ रुग्णांची नोंद