मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीला येणाऱ्या पुराच्या संकटातून मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेने मिठी नदी विकास प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पावसाळ्यात मिठी नदीच्या पातळीत वाढ कैद करण्यासाठी सेन्सर्स बसवण्यात येणार आहे. कुर्ला येथील श्रीकृष्ण नगर ते माहीम कॉजवे तसेच वाकोला नदी परिसरात सुमारे १,७०० कोटी रुपयांच्या विकासकामांची देखरेख करण्यासाठी पालिका स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करणार असून त्यासाठी १०.६० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मिठी नदी ही मुंबई शहरासह पूर्व व पश्चिम उपनगरांमधून वाहणारी महत्त्वाची नदी आहे. नदी विकास प्रकल्पाचे चार टप्पे निश्चित करण्यात आले असून तिसऱ्या टप्प्यातील विविध कामे गेली तीन वर्षे निविदा प्रक्रियेत अडकून पडली होती.
तिसऱ्या टप्प्यात मिठी आणि वाकोला नदीच्या ज्वारीय क्षेत्रात मिसळणारे सांडपाणी रोखणे, नियोजित वाहिन्यांद्वारे ते मुख्य मलनिस्सारण वाहिनीत वळविणे, मिठी नदीचा उर्वरित ३०० मीटर भाग रुंद व खोल करणे, संरक्षक भिंत उभारणे, सेवा रस्ता तयार करणे, ८,८५० मीटर लांबीचा पदपथ (प्रोमेनेड) आणि पूरनियंत्रणासाठी फ्लड गेट्स उभारणे यांचा समावेश आहे.
स्वतंत्र पीएमसी नियुक्त करण्याचा निर्णय
इतक्या मोठ्या प्रकल्पाची गुणवत्ता, कामाचा वेग आणि वेळेत पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी पालिकेने स्वतंत्र पीएमसी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्त सल्लागार संस्थेकडून कामांची दैनंदिन पाहणी, तांत्रिक मार्गदर्शन, कंत्राटदारांच्या बिलांचे प्रमाणीकरण, फ्लड गेट्स, सेवा रस्ते आणि इतर नागरी कामांची गुणवत्ता तपासणी केली जाणार आहे.