- विशेष
- रोहित गुरव
मार्च महिन्यातच मुंबईची हवा गरम झाली आहे. दुपारी उन्हाचे चटके बसत आहेत. झाडांच्या सावलीची उणीव तीव्रतेने जाणवत आहे. अशावेळी आठवण येते ती मियावाकी जंगलांची. मुंबईत काही ठिकाणी ही मियावाकी जंगलं उभी राहत आहेत. या मियावाकी जंगलांची संख्या वाढली तर मुंबईला थोडा तरी गारवा लाभेल. २३ मार्च या जागतिक हवामान दिनानिमित्त या मियावाकी जंगलाचे महत्त्व समजून घ्यायला हवे.
फुलझाडांभोवती रंगीबेरंगी विविध जातकुळीच्या फुलपाखरांचे विहरणे, छोटे छोटे कीटक, किडे, पक्षी यांचा हळूहळू वाढत असलेला वावर हे चित्र आहे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक एकरमध्ये लागवड केलेल्या मियावाकी जंगलाचे. मुंबईतून घटत्या चिऊताईंचा चिवचिवाट, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट या झाडांवर हमखास ऐकू येत आहे. भायखळा येथील राणीच्या बागेतील टायगर बॅरिकेटच्या शेजारी असलेल्या जपानच्या धर्तीवरील ‘मिनी फॉरेस्ट’नेही बऱ्यापैकी बाळसे धरले आहे. पक्षी, छोटे प्राणी, कीटक यांची अन्नसाखळी या वनराईत आता तग धरू लागली आहे. फुलपाखरे बागडू लागली आहेत.
इमारतीकरण, नवनवे महामार्ग यांच्या मागे वेगाने धावत असलेल्या मुंबईत मायदेशी वाणाची झाडे रुजून येणे तसे कठीणच. या नैसर्गिक प्रक्रियेसाठी मुंबईत मातीची जागा शिल्लक आहे कुठे? जगातील सर्वच विकसित आणि विकसनशील देशांना भेडसावणारा हा गंभीर प्रश्न आहे. जागतिक ख्यातीच्या शहरांना सिमेंट काँक्रीटचा विळखा कचकचून बसला आहे. विकासाचा माग घेताना हरित संपदेवर कुऱ्हाड चालवली जात आहे. त्यात घटत्या वनसंपदेसोबत स्थानिक वाणाच्या वृक्ष प्रजाती हद्दपार होत आहेत. त्यामुळे छोटे पक्षी, कीटकांचा अधिवास धोक्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणवादी आणि निसर्गप्रेमींच्या धडपडीतून जपानच्या धर्तीवर ‘मियावाकी’ हा कमीत कमी जागेतला घनदाट वृक्षलागवडीचा पर्याय पुढे आला आहे. याला शहरातील छोटेखानी जंगल (मिनी फॉरेस्ट) म्हणूनही संबोधू शकतो. कमीत कमी जागेत स्वदेशी वाणाच्या अधिकतम प्रजातींची लागवड करणे म्हणजे ‘मियावाकी’ होय. यात नैसर्गिक वनांशी साधर्म्य असलेले वनीकरण कृत्रिमरीत्या उभारले जाते. हे छोटेखानी जंगल म्हणजे केवळ हरित संपदा इतका मर्यादित अर्थ होत नाही, तर पर्यावरण आणि परिसंस्थेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. पक्षी, कीटक यांचा अधिवास, त्यांची अन्नसाखळी, मुंबईसारख्या शहरातील पर्यावरण संतुलन अशा नानाविध कारणांसाठी मियावाकी जंगल उपयुक्त ठरते. त्यासाठी झाडांची निवड गरजेची ठरते. अतिशय योग्य निवड करत हे ‘मिनी फॉरेस्ट’ उभारणे आवश्यक आहे.
मुंबईत (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वगळून) १०० पेक्षा अधिक प्रजातींच्या झाडांचे अस्तित्व आढळते. एकेकाळी या झाडांची संख्या मुंबईत मोठ्या प्रमाणात होती. मात्र ही मूळची झाडे आता मुंबईतून दुर्मिळ किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मियावाकीच्या निमित्ताने या झाडांना पुनर्जन्म मिळत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ही झाडे बऱ्यापैकी आकाराला आल्यावर त्याच्या बिया हवेने किंवा पक्ष्यांमार्फत अन्यत्र पडून या प्रजातींच्या झाडांच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
खरे तर जंगल उभारणे ही आपली संकल्पना नव्हे. भौगोलिक दृष्टिकोनातून तशी गरज कधीच आपल्याला भासली नाही. आहे त्या वनसंपदेचे संवर्धन केले तरी पुरेसे. मात्र शहरांतील घटत्या वनक्षेत्रामुळे आता ही काळाची गरज बनू लागली आहे. जपानमध्ये समुद्राचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. समुद्राच्या पाण्यापासून बचावासाठी, जैविकतेसाठी तेथे किनारपट्टी भागात अशी दाटीवाटीची ‘ग्रीन वॉल’ उभारली जाते. वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी ही संकल्पना पुढे आणली. विकासाच्या मागे धावणाऱ्या देशांत ही संकल्पना आता वेगाने स्वीकारली जात आहे.
मियावाकी जंगल उभारताना साधारणतः दोन-अडीच फुटांच्या अंतराने एकमेकांना खेटून झाडांची लागवड केली जाते. फुले, फळे, काटेरी झाडे, औषधी, दुर्मिळ अशा स्थानिक झाडांचा त्यात समावेश असतो. तुलनेने अल्पावधीत ही झाडे झटपट वाढतात. खेटून लागवड केल्याने सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा, मातीत पाणी साचवून ठेवण्याची सोय, मातीत गवताचा थर, जमिनीतून मिळणारी पोषकद्रव्ये, पाण्यासाठी चढाओढ यामुळे ही झाडे सामान्य झाडांच्या तुलनेत तब्बल १० पट अधिक वेगाने वाढतात. जडणघडणीमध्ये वेगळेपण असल्याने सामान्य झाड आणि मियावाकी वृक्ष यांच्या स्ट्रक्चरमध्येही बराच फरक असतो. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी मियावाकी झाडांमध्ये असलेली भूक आणि ती भागवण्यासाठी असलेली धडपड यामुळे ही झाडे तुलनेने झटपट वाढत असल्याचे मियावाकी तज्ज्ञ मोहम्मद दिलावर सांगतात.
कालांतराने ती इतकी दाट होतात की त्यातून सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचणे अशक्यप्राय होते. गेल्या आठ-दहा वर्षांत लागवड केलेल्या या मिनी जंगलांनी मुंबापुरीत बऱ्यापैकी जोर धरला आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत चार ते पाच वर्षांपूर्वी लावलेले साधारण तीन गुंठ्यांतील हे मिनी फॉरेस्ट पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. छत्रीसारखा शाखा विस्तार असलेल्या, हातपाय पसरलेल्या महाकाय अशा परदेशी वाणाच्या (‘रेन ट्री’ हे इंग्रजकालीन वृक्ष) झाडांमध्ये हे टुमदार जंगल आपले वेगळेपण टिकवून आहे. खैर, पांढरा खैर, बबुल, थोरला गुंज, बेल, सीरिस, फणस, जांभूळ अशी मुंबईतील मूळच्या वाणाची तब्बल ६० ते ६५ प्रजातींची झाडे येथे आढळत असल्याचे राणीच्या बागेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम सांगतात.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पक्ष्यांना डोळ्यासमोर ठेवून एक एकरमध्ये मिनी फॉरेस्ट तयार केले आहे. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी ‘फॉरेस्टमधील फॉरेस्ट’ ही संकल्पना येथे राबवली गेली आहे.
वृक्ष लागवड करताना त्या भागाचा भौगोलिक विचार करणे आवश्यक असते. मुंबई हे मूळचे बेट आहे. समुद्रात भरणी घालून हा प्रदेश विस्तारला आहे. इथल्या जमिनीत खारटपणा आहे. त्यामुळे झाडांची निवड करताना काळजी घेतली जात असल्याचे मोहम्मद दिलावर सांगतात.
जागेचा प्रश्न भेडसावणाऱ्या मुंबईसारख्या शहरात जपानच्या धर्तीवरचा मिनी जंगलाचा पर्याय उत्तम आहे. इमारती लगतच्या छोटेखानी कोनाड्यातही याचा प्रयोग करता येतो. तो हमखास करून पाहण्यासारखा आहे.
डॉ. अकिरा मियावाकी
कमीत कमी जागेत घनदाट जंगल निर्माण करण्याची पद्धत जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी १९७० मध्ये विकसित केली. त्यावरूनच त्याला ‘मियावाकी’ असे नाव पडले. जपानमधील तत्कालीन ६४ टक्के क्षेत्रावरील देशी वृक्षांचे जंगल विविध कारणांमुळे नष्ट झाले होते. यावर उपाय म्हणून त्यांनी देशी वाणाच्या बियांची साठवण करून रोपवाटिका तयार केली आणि सहकाऱ्यांसोबत जंगल निर्मितीचे प्रयोग सुरू केले. लोकसहभागातून त्यांनी जपानमध्ये हजारापेक्षा जास्त ठिकाणी मियावाकी जंगलाची उभारणी केली. त्यामुळे हरित क्षेत्र वाढण्यास मदत झाली. पर्यावरणाप्रती केलेल्या कामासाठी मियावाकी यांना ‘अशाही प्राईज’ व ‘ब्लू प्लानेट प्राईज’ हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान या जंगल निर्मितीस काही कारणांमुळे निसर्ग अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. चुकीच्या ठिकाणी लागवड करणे, लागवडीसाठी योग्य झाडांची निवड न होणे, तसेच हे जंगल नैसर्गिक जंगलाची जागा घेऊ शकत नाही, असा हा आक्षेप आहे. मोकळे डोंगर, माळरान, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश या ठिकाणांची मियावाकी जंगल उभारणीसाठी निवड केली जाऊ शकते. शेत जमीन, घराशेजारी, सोसायटीमधील परिसर, शाळा-कॉलेज व विद्यापीठांचा परिसर, तसेच मोकळ्या जागांवर मियावाकी जंगलाची उभारणी करणे योग्य ठरेल.
guravrohit1987@gmail.com