मुंबई : मुंबई परिमंडळातील उपनगरीय विभागाच्या पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीसांकडून दररोज सुमारे ३ हजार तिकीट नसलेले प्रवासी पकडले जातात. यापैकी ५५० हून अधिक प्रकरणांमध्ये वातानुकूलित उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या आकडेवारीनुसार, जुलै २०२४ मध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रात ८४ हजार तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून २.७५ कोटी दंड वसूल करण्यात आला. यामध्ये वातानुकूलित लोकल ट्रेनमधील तिकीटविरहित प्रवासाच्या एकूण १७,४०० प्रकरणांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, वातानुकूलित लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी, महिन्याभरात अनेक तिकीट तपासणी मोहीम राबवली जाते. या मोहिमेमुळे एप्रिल ते जुलै २०२४ मध्ये सुमारे १७,४०० अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला. त्यांच्याकडून ६० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवरील नियमित प्रवाशांच्या सोयीसाठी, तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांच्या त्रासाला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच पॅसेंजर ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते जुलै २०२४ या महिन्यांत मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबविण्यण्यात आली. त्याद्वारे ५७.३५ कोटी रुपयांची रक्कम वसूल केली. यामध्ये मुंबईतील १७.३९ कोटी रुपयांच्या दंडाचाही समावेश आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै २०२४ मध्ये १.२२ लाख विनातिकीट प्रवाशांद्वारे रु. ५.२० कोटी वसूल करण्यात आले आहेत. पैकी पश्चिम रेल्वेच्या अधिकारक्षेत्रातील विविध प्रकरणांसह २.७५ कोटी रुपये हे ८४ हजार प्रवाशांकडून वसूल करण्यात आले.