मुंबई : गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर १, २ आणि ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या अदानी समूह यांच्यात मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सोमवारी करार करण्यात आला. त्यामुळे मुंबईतील आणखी एक प्रकल्प अदानींकडे गेला आहे.
म्हाडा मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, अदानी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रणव अदानी आदी उपस्थित होते. यावेळी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासमोर प्रकल्पाच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी जयस्वाल म्हणाले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टिकोनातून या प्रकल्पाला नवीन आशा आणि दिशा मिळाली आहे. मोतीलाल नगरच्या रहिवाशांनी जे स्वप्न अनेक वर्षे उराशी बाळगले, त्याची मूर्त रूपरेषा आता प्रत्यक्षात येत आहे. देशातील सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प या माध्यमातून राबविण्याचे व म्हाडा या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपून पुढे जाईल.”
पुनर्विकासाचे स्वप्न आता केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरणार आहे, असेही ते पुढे म्हणाले. पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित व सुसज्ज घरे प्रदान करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल म्हाडातर्फे उचलण्यात आले आहे.
१४२ एकर जागेवरील मोतीलाल नगर या म्हाडा वसाहतीची व्याप्ती लक्षात घेता, कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट पद्धतीने राबविण्यात येणारा देशातील पुनर्विकासाचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘म्हाडा’तर्फे येथील रहिवाशांचे १६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेमध्ये मोफत पुनर्वसन होणार आहे. सदर पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला ०३ लाख ९७ हजार १०० चौरस मीटर क्षेत्र विकासकाकडून बांधून मिळणार आहे. या माध्यमातून नजीकच्या भविष्यात ‘म्हाडा’कडे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होणार आहे. बांधकाम व विकास संस्थेमार्फत मोतीलाल नगरचा पुनर्विकास करण्याची परवानगी म्हाडाला शासनाकडून प्राप्त झाली.
राज्य शासनाने याला ‘विशेष प्रकल्प’ म्हणून मान्यता देऊन म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे हा प्रकल्प राबविण्याचे शासन निर्णयाद्वारे निर्देशित केले. मुंबई उच्च न्यायालयाने म्हाडाला कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीच्या माध्यमातून हा पुनर्विकास करायला परवानगी दिली. त्यानंतर मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकासासाठी मुंबई मंडळातर्फे कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आली. सदर निविदा अदानी समूहाला मिळाली आहे.
मोतीलाल नगर १, २ व ३ मध्ये ३७०० गाळे असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसन साधारणपणे ०५ लाख ८४ हजार १०० चौरस मीटर जागेवर करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अनिवासी गाळेधारकांना ९८७ चौरस मीटर चौरस फुटांचे व्यावसायिक गाळे दिले जाणार आहेत. या पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन सदनिकांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी सात वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
लंडनस्थित संस्थेकडून पायाभूत सुविधांचा आराखडा तयार
रहिवाशांना पुनर्विकासात प्रथम प्राधान्य दिले जाणार असून या प्रकल्पात वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. अदानी समूहाने मोतीलाल नगरचा आराखडा बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागारांची मदत घेतली आहे. ‘मॅकेनो’ या नेदरलँड्सस्थित जगविख्यात आर्किटेक्चर फर्मने मोतीलाल नगरचा बृहत आराखडा तयार केला आहे. ‘ब्युरो हॅप्पोल्ड’ ही पायाभूत सुविधा क्षेत्रांतील लंडनस्थित सल्लागार सेवा देणारी संस्था असून या संस्थेने मोतीलाल नगरचा पायाभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे.
१५ मिनिटांवर शाळा, मेट्रो, हॉस्पिटल
सदर प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प असून ‘१५ मिनिटांचे शहर’ या संकल्पनेवर आधारित आहे. या संकल्पनेद्वारे या प्रकल्पातील घरांपासून कार्यालय, सार्वजनिक परिवहन सेवा, मेट्रो स्टेशन, उद्यान, मनोरंजन ठिकाण, शाळा, हॉस्पिटल १५ मिनिटांच्या अंतरावर असणार आहे. पाच एकरचे मध्यवर्ती उद्यान हे या प्रकल्पातील वैशिष्ट्य आहे. रहिवाशांना पुनर्विकासात प्रथम प्राधान्य दिले जाणार असून या प्रकल्पात वाहतूक व्यवस्थेचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पातील पुनर्वसन निवासी सदनिकांच्या इमारतींवर सोलार पॅनेल बसविले जाणार आहेत.
मास्टरप्लॅन - प्रमुख वैशिष्ट्ये
लोकांना प्राधान्य देणारी आणि समुदाय-केंद्रित नियोजन पद्धत.
मिश्र वापराचे, सुरक्षित आणि आरोग्यदायी शेजारी परिसर.
चालण्यायोग्य आणि सहज सुलभ ‘१५-मिनिटांचे शहर’ संकल्पना, जी निवासी भाग, कार्यालयीन क्षेत्रे, खरेदी व करमणूक केंद्रे, सार्वजनिक सेवा, शिक्षण आणि आरोग्य सुविधा यांच्यात अखंड जोड दर्शवते.
सार्वजनिक परिवहन सुविधांच्या सान्निध्यात आणि सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी धोरणात्मक स्थाननिर्धारण.
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांचा समावेश असलेली उत्कृष्ट दर्जाची सामाजिक पायाभूत सुविधा.
विभागांमध्ये सलग आणि अखंड पादचारी जाळ्याद्वारे जोडणी - फेरफटका घेण्याचे मार्ग, रस्ते आणि चौक यांचा समावेश.
परिसराशी सुसंगतपणे जोडलेल्या नियोजित आणि सुसंघटित पार्किंग सुविधा.
समुदायांचा अविभाज्य भाग असलेल्या, वनस्पती व प्राणी जीवनाने समृद्ध अशा मोठ्या प्रमाणातील मोकळ्या हरित जागा.
स्वच्छ हवा, पूरमुक्त विकास आणि संरक्षित जागा सुनिश्चित करणारे शाश्वत आणि हवामानसुसंगत नियोजन.