महागाईचा भडका! MSRDC कडून ‘टोलवाढ’; मुंबईत भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तू महागणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

महागाईचा भडका! MSRDC कडून ‘टोलवाढ’; मुंबईत भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तू महागणार

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाशी (सायन-पनवेल महामार्ग), मुलुंड (एलबीएस रोड), मुलुंड (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे), ऐरोली पूल आणि दहिसर (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) या पाच प्रवेशमार्गांवर मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरात १ ऑक्टोबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

Swapnil S

स्वीटी भागवत

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वाशी (सायन-पनवेल महामार्ग), मुलुंड (एलबीएस रोड), मुलुंड (ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे), ऐरोली पूल आणि दहिसर (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे) या पाच प्रवेशमार्गांवर मुंबईत प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांच्या टोल दरात १ ऑक्टोबरपासून वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. महामंडळाने मुंबईच्या पाच प्रवेशद्वारांवर व्यावसायिक वाहनांसाठी सुधारित टोल दर लागू केले आहेत.

मिनी बस आणि हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी १ ऑक्टोबर २०२६ पासून प्रति फेरी ९० रुपये, ट्रक व बससाठी १८० रुपये, तर अवजड वाहनांसाठी २२५ रुपये टोल आकारला जाणार आहे. यापूर्वी हे दर अनुक्रमे ७५, १५० आणि १८० रुपये होते. ऑक्टोबर २०२३ मध्ये या दरांमध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती.

नाशिक, पुणे तसेच राज्यातील इतर भागांतून दररोज मुंबईत भाजीपाला, फळे आणि विविध माल घेऊन येणाऱ्या वाहनांवर या टोलवाढीचा थेट परिणाम होणार आहे. वाहतूक खर्चात झालेली वाढ व्यापारी ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्यता असल्याने त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो. मुंबईच्या या पाच प्रवेशद्वारांचे व्यवस्थापन मुंबई एंट्री पॉइंट्स लिमिटेडकडे आहे. कंपनीला २०१० मध्ये २,१०० कोटी रुपयांच्या मोबदल्यात १६ वर्षांचा करार देण्यात आला होता. या कराराअंतर्गत टोल वसुलीसह २७ उड्डाणपुलांच्या देखभालीची जबाबदारी कंपनीकडे होती. हा करार २०२६ मध्ये संपणार आहे.

हलक्या वाहनांना सूट देण्यात आल्याने तोटा

दरम्यान, ऑक्टोबर २०२४ मध्ये हलक्या मोटार वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली होती. त्यानंतर सरकारला दररोज सुमारे ५० लाख रुपयांच्या महसुली तोट्याचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले आहे. तुलनेने कमी संख्येने असलेल्या अवजड वाहनांकडून महसुलाचा मोठा हिस्सा मिळतो. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे सल्लागार आणि माजी अध्यक्ष बाल मलकित सिंह यांनी मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील टोलवसुली अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे सांगत, प्रकल्पाचा खर्च वसूल झाला असल्याचा दावा केला. त्यामुळे टोलवसुली बंद करण्याची मागणी त्यांनी केली होती.

अवजड वाहनांनाही सूट देण्याची मागणी

टोलवाढीमुळे ट्रकसह अवजड वाहनांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. त्यातच इंधनाच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च आधीच वाढला आहे. त्यामुळे महागाईवर आणखी दबाव निर्माण होईल. या अतिरिक्त खर्चाचा भार अखेर सर्वसामान्य ग्राहकांवरच पडून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात, असे सिंह यांनी म्हटले. हलक्या वाहनांप्रमाणेच अवजड वाहनांनाही टोलमधून सूट देण्याची मागणी त्यांनी केली.

सर्वसामान्यांच्या घरखर्चावर ताण

दरम्यान, अंधेरी पूर्व येथील गृहकामगार ज्योती शृंगारे यांनी भाजीपाल्याच्या वाढत्या दरांबाबत चिंता व्यक्त केली. कमी पावसामुळे पुरवठ्यावर परिणाम होत असून भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी ५०० ग्रॅम भाजीपाल्यासाठीही ५० रुपयांपेक्षा अधिक खर्च येत असल्याचे त्यांनी सांगितले. चार जणांच्या कुटुंबासाठी भाजीपाला आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. वाहतूक खर्च आणि टोल आणखी वाढल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतील आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या घरखर्चावर आणखी ताण येईल,” असे शृंगारे यांनी सांगितले.

मुंबईतील टोल आकारणीची पाच ठिकाणे

  • वाशी – सायन-पनवेल महामार्ग

  • मुलुंड – एलबीएस रोड

  • मुलुंड – ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ऐरोली पूल

  • दहिसर – वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शस्त्रास्त्रांची स्पर्धा आता कुठवर जाणार?

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Soya Kheema Recipe: रात्रीच्या जेवणासाठी बनवा चमचमीत मसाला सोया खिमा; चव अगदी रेस्टॉरंटसारखी

Saree Styling Tips : साडीमध्ये दिसायचंय लाखांत एक? स्टायलिंगच्या या ५ गोष्टी विसरू नका