मुंबई : किरकोळ भांडणातून मुंबई लोकलमध्ये मयंक लोहार याच्या हत्येने मुंबई शहर सुन्न झाले आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन सुवर्णा याला न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. मात्र, पोलिसांना या गुन्ह्यात वापरलेले हत्यार अद्याप सापडलेले नाही.
अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान मंगळवारी रात्री प्रथम वर्गाच्या डब्यात मयंक लोहार (२०) याची सचिन सुवर्णा याने हत्या केली. पावसामुळे लोकलचा दरवाजा उघडा ठेवण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता.
घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून बुधवारी पनवेलमधून सुवर्णाला अटक केली. गुरुवारी बोरिवली सरकारी रेल्वे पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.
गुन्ह्यात वापरलेले हत्यार शोधण्यासाठी, हत्येचा नेमका हेतू जाणून घेण्यासाठी आणि आरोपीचा काही गुन्हेगारी इतिहास आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याची कोठडीत चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. तसेच, प्राथमिक तपासात ही घटना वादातून घडल्याचे दिसत असले तरी, पीडित आणि आरोपीमध्ये पूर्वीची काही शत्रूत्व होते का याचाही तपास पोलीस करत आहेत.
आरोपीचे वकील जयवंत पाटील यांनी युक्तिवाद केला की, ही घटना क्षणिक रागातून घडली असून दोघांमध्ये पूर्वीचे कोणतेही वैर नव्हते. आरोपी मद्यधुंद होता असा जो दावा केला जात आहे, त्यासाठी कोणताही पुरावा नसल्याचेही वकिलांनी सांगितले. आरोपीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही आणि हत्यार हस्तगत करण्यासाठी त्याला इतके दिवस कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.