मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनधिकृत व अनियंत्रित पद्धतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम टर्फ आणि बॉक्स क्रिकेटच्या मैदानांना शिस्त लागणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने ‘ॲडव्हान्स्ड स्मार्ट टर्फ पॉलिसी’ लागू करावी, या संदर्भातील ठरावाची सूचना महापालिकेत सर्वानुमते मंजूर करण्यात आली आहे. भाजप नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य तेजिंदरसिंह तिवाना यांनी मांडलेल्या या ठरावाला मंजुरी मिळाल्याने आता महापालिका प्रशासनाला यावर तातडीने कृती अहवाल सादर करावा लागणार आहे.
मुंबईत मोकळ्या मैदानांची कमतरता असल्याने गेल्या काही वर्षांत १,५०० हून अधिक टर्फ सुरू झाले आहेत. मात्र स्पष्ट नियमावली नसल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा आणि शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता. हा ठराव मंजूर झाल्यामुळे टर्फ खेळाला मदत होणार आहे.
छत जाळी अनिवार्य !
सुरक्षेच्या दृष्टीने आणि निवासी भागातील उपद्रव टाळण्यासाठी सर्व टर्फवर संरक्षणात्मक छत जाळी बसवणे बंधनकारक असणार आहे. नियमित तपासणी व कडक नियम: ध्वनी प्रदूषण, फ्लडलाइट्सचा त्रास, वाहतूककोंडी, अग्निसुरक्षा आणि पर्यावरण नियमांचे पालन केले जाईल.
गैरसोय थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरण
रात्री उशिरापर्यंत चालणारा गोंधळ आणि प्रखर फ्लडलाइट्समुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी हे धोरण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. टर्फवर बंदी न घालता खेळाडूंची सोय व स्थानिकांची शांतता यांचा सुवर्णमध्य साधणारा ठराव मानला जात आहे.
तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे!
मुंबईला क्रीडाप्रेमी शहर बनवताना नागरिकांच्या स्वास्थ्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. आमचा उद्देश टर्फ बंद करण्याचा नसून त्यांना आधुनिक व कायदेशीर चौकटीत आणण्याचा आहे. ठराव मंजूर झाल्यामुळे आता महापालिका आयुक्तांनी यावर तातडीने अंमलबजावणी अहवाल सादर करावा, ही आमची मागणी आहे.तेजिंदरसिंह तिवाना, नगरसेवक व स्थायी समिती सदस्य, भाजप