Mumbai : वायू प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट; कचरा, वाहनांच्या प्रदूषणावर विशेष लक्ष, महापौर, उपमहापौरांचे पालिकेला आदेश 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : वायू प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट; कचरा, वाहनांच्या प्रदूषणावर विशेष लक्ष, महापौर, उपमहापौरांचे पालिकेला आदेश

वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक विभागात वायू प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट निश्चित करून अद्ययावत यादी व नकाशे तयार करण्यात येणार आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कचरा, वाहने, बांधकाम राडारोड्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर विशेष लक्ष असणार आहे.

Swapnil S

मुंबई : वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबईतील प्रत्येक विभागात वायू प्रदूषणाचे १० हॉटस्पॉट निश्चित करून अद्ययावत यादी व नकाशे तयार करण्यात येणार आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कचरा, वाहने, बांधकाम राडारोड्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी विविध प्रदूषणकारी स्रोतांवर प्रभावी उपाययोजना व नियमभंग करणाऱ्यांवर कठोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६' तयार केला आहे.

महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वातावरण अधिकाधिक स्वच्छ आणि पर्यावरणस्नेही राहावे यासाठी या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा प्रभाग स्तरावर नियमित आढावा घेण्यात येणार आहे तसेच वायू प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.

खुल्या जागेत कचरा जाळणे व वाहनांचे प्रदूषण!

मुंबईतील मोकळ्या जागी कचरा जाळण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रभाग स्तरावरील मार्शल्स आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून अशा घटनांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. तसेच, प्रमुख वाहतूक मार्ग व वाहतूककोंडीच्या ठिकाणी विशेष पीयूसी तपासणी मोहीम राबवून दृश्यमान धूर सोडणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

बांधकाम ठिकाणापासून ५०० मीटरची स्वच्छता राखणे!

बांधकामस्थळाच्या आकारानुसार संबंधित विकासक किंवा कंत्राटदाराने लगतचे रस्तेही स्वच्छ ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ४,००० चौरस मीटर पर्यंतच्या प्रकल्पासाठी १०० मीटर, ४,००० ते १०,००० चौरस मीटर प्रकल्पासाठी २०० मीटर आणि १०,००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या प्रकल्पासाठी दोन्ही बाजूंना ५०० मीटरपर्यंतचे रस्ते स्वच्छ ठेवावे लागणार आहेत.

राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांवर नियंत्रण

बांधकाम व पाडकाम कचरा वाहून नेणारी वाहने पूर्णपणे झाकलेली असणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर येण्यापूर्वी त्यांच्या चाकांची स्वच्छता करणे आवश्यक राहणार आहे. राडारोडा वाहतुकीचे व विल्हेवाटीचे नियंत्रणाद्वारे करण्यात येणार आहे. रेडी मिक्स काँक्रिट वाहनांमधून रस्त्यावर काँक्रिट किंवा अन्य सामग्री सांडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

...तर प्रदूषणकारी कामे बंद!

वायू गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने देखरेख ठेवून परिस्थितीनुसार Graded Response Action Plan (GRAP) अंतर्गत उपाययोजना करण्यात येणार आहेत. वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक झाल्यास संबंधित परिसरात विशेष सखोल स्वच्छता, आवश्यक असेल तर रस्ते धुणे, पाण्याची फवारणी, मिस्टिंग तसेच खुल्या जागी कचरा जाळण्यावर कडक नियंत्रण यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. एखाद्या ठिकाणी हा निर्देशांक सलग तीन दिवस ३०० पेक्षा अधिक राहिल्यास, त्या स्थानकाच्या २ किलोमीटर परिसरातील प्रदूषणकारी कामे बंद करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बांधकाम स्थळांवरील प्रदूषणावर नियंत्रण

बांधकाम व पाडकामस्थळांवर विद्यमान २८ कलमी मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम स्थळांवर कारणे दाखवा नोटीस, कामबंदीची नोटीस तसेच आवश्यकतेनुसार सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाने दररोज किमान दोन बांधकामस्थळांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विशेष स्वच्छता मोहीम

पावसाळ्यानंतर रस्त्यांवर साचलेला गाळ, चिखल आणि धूळ हटविण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात ‘पोस्ट-मॉन्सून डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ राबविण्यात येणार आहे. प्रमुख रस्ते, दुभाजक, चौक व रस्त्यांच्या कडांची स्वच्छता करण्यात येणार आहे. आवश्यकता असेल तर पुनर्वापराच्या पाण्याने रस्ते धुणे अथवा पाण्याची सूक्ष्म फवारणी केली जाणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक चार रात्री बंद; ऐरोली-काटई नाका पुलावर गर्डर टाकण्याचे काम, वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

Mumbai : जोगेश्वरी उड्डाणपुलाची होणार दुरुस्ती; महापालिका २७ कोटी २४ लाख खर्च करणार, सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे नियोजन

Mumbai : 'ठाकरें'च्या मोर्च्याचा मार्ग बदलला; मेट्रो सिनेमा ते पालिका मुख्यालय असा निघेल मोर्चा, पोलिसांच्या विनंतीनुसार घेतला निर्णय

Thane : पूर्णेकर हत्या प्रकरणामध्ये आरोप-प्रत्यारोप; आणखी दोघांना अटक

निर्भेळ यशाचे लक्ष्य; गोलंदाजांवर पुन्हा लक्ष! भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना